आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला
By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 03:13 PM2020-11-29T15:13:23+5:302020-11-29T15:15:53+5:30
Farmer News : नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून, या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
शेतकरी नेत्यांच्या बैठकीस उपस्थित असलेले स्वराज पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आज सकाळी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांची बैठक झाली. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काल रात्री गृहसचिवांनी पाठवलेल्या पत्रात कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी रस्ते रिकामी करून बुराडी येथे येण्याची अट घालण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ही अट फेटाळून लावली आहे. आमचा हेतू रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा नाही आहे. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशा परिस्थिती सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे योग्य नाही.
Delhi: Farmers continue their protest against the farm laws, at Nirankari Samagam Ground in Burari, the govt designated place for the protest.
— ANI (@ANI) November 29, 2020
"Our leaders are holding a meeting. We will follow whatever they decide," says an agitating farmer. pic.twitter.com/J6AbZyVr4m
यादव यांनी सांगितले की, या मुद्यावर बुराडी येथे आज संध्याकाळी चार वाजता शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी सांगितले की, २६ तारखेला दिल्ली चलोची जी हाक देण्यात आली होती ती संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आली होती. संयुक्त किसान मोर्चामध्ये देशभरातील ४५० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना ७ सदस्यांची एक समिती बनवण्यात आली होती. त्या सात सदस्यांपैकी मी एक आहे.
सध्या शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीला इतर राज्यांना जोडणाऱ्या सीमांवर जमले आहेत. पंजाबमधून आलेले शेतकरी दिल्लीतील सिंघू आणि टिकरी सीमेवर जमले आहेत. तर उत्तर प्रदेशच्या सीमेवरसुद्धा भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी हजारोंच्या संख्येने जमले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी शनिवारी दिल्लीतील एका बाजूला कूच केली आणि दिल्लीतील विविध सीमांवर ठाण मांडले आहे.