Agneepath: आंदोलनाची धग संपवण्यासाठी आणखी सवलती, अग्निपथ योजनेतील तरुणांना निमलष्करी दलांत १० % आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:57 AM2022-06-19T07:57:45+5:302022-06-19T07:58:08+5:30
Agneepath: अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली.
नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. अग्निवीरांना या निमलष्करी दलांत भरती होण्यासाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णयही घोषित करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करून याची घोषणा केली. त्यात म्हटले आहे की, सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भरतीत अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या दलांमध्ये भरतीसाठी कमाल वयाची अट अग्निवीरांसाठी तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी ही सवलत ५ वर्षांची असेल. सध्या निमलष्करी दलात भरती होण्यासाठी तरुणाचे वय १८ ते २३ वर्षे या दरम्यान असावे, असा नियम आहे. अग्निवीरांना २३ वर्षांच्या पुढे आणखी ३ वर्षे भरती होण्यासाठी मिळतील.
दरम्यान, अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आंदोलकांनी जहानाबादमध्ये बस व ट्रक जाळली. तारेगना रेल्वेस्थानकावर आग लावली. पंजाबमधील लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले.
कोचिंग क्लासेसनी हिंसाचार भडकवला
पाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा हात असल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांना काही भक्कम पुरावे मिळाले आहेत. काही कोचिंग सेंटरच्या परिसरात जाळपोळ झाल्याचे उघड झाले आहे.
योजना माजी सैनिकांशी चर्चेनंतरच : राजनाथसिंह
माजी सैनिकांशी व्यापक विचार-विमर्ष करूनच अग्निपथ योजना आणली गेली आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अग्निपथ योजनेबाबत राजकीय कारणांमुळे गैरसमज पसरविले जात आहेत. ही योजना लष्कर भरतीत क्रांतिकारक बदल आणण्यास सक्षम आहे.
पंतप्रधानांना ‘माफीवीर’ बनावे लागेल; राहुल गांधी यांची टीका
वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत घ्यावे लागले होते, त्याच प्रमाणे अग्निपथ योजनाही त्यांना मागे घ्यावी लागेल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. राहुल यांनी ट्विट केले की, आठ वर्षांत भाजपा सरकारने ‘जय जवान, जय किसान’ मूल्यांचा अपमान केला. आताही पंतप्रधानांना ‘माफीवीर’ बनून ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी लागेल.
मालेगाव, अहमदनगरमध्ये मोर्चे
मुंबई / नाशिक / बीड : अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचे लोण अद्याप राज्यात पोहोचले नसले तरी यामुळे राज्यात रेल्वेसेवा विस्कळीत झाली. भुसावळ विभागातील ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. अग्निपथच्या विरोधात शनिवारी मालेगाव (जि. नाशिक) बीड आणि अहमदनगर येथे मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये रेल्वेला आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागात धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ तासांहून अधिक उशिराने धावत असून, रेल्वे प्रशासनाने काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. भुसावळ विभागातून बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधून येणाऱ्या ११ रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.