अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:13 AM2022-06-19T07:13:25+5:302022-06-19T07:14:02+5:30

Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Agneepath Protest: Coaching classes behind violent protests in Bihar, evidence in police hands, information obtained from WhatsApp message | अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती

अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती

Next

पाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासन दोषींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याची राजधानी पाटण्यापासून राज्याच्या जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या काही कोचिंग सेंटरच्या परिसरात विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याचे उघड झाले आहे.

पाटण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, अटकेतील काहीजणांच्या मोबाइलमध्ये काही कोचिंग सेंटरचे व्हिडिओ फुटेज व व्हॉट्सॲप संदेश मिळाले. त्यावरून जे कोचिंग सेंटर यात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काही संचालकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातील हिंसक घटना पाहून १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

सोशल मीडियाचा वापर कमी
आंदोलनातील विद्यार्थ्यांनी त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले आहेत. आरआरबी-एनटीपीसी विरोधात झालेल्या आंदोलनात कोचिंग संचालकांची नावे पुढे आली होती. त्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी चळवळ निश्चित करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. यासाठी आता सोशल मीडियाचा कमीत कमी वापर केला जात आहे.

हिमाचल प्रदेशात आंदोलन
हिमाचल प्रदेशातही अग्निपथ योजनेच्या विरोधात जागोजागी निदर्शने केली जात आहेत. कांगडा जिल्ह्यातील जसूर भागात आंदोलन करण्यात आले. मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर १० किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती. युवकांनी रेल्वे रुळांवर मोठ-मोठे दगड व लोखंडी गर्डर ठेवले होते. पोलीस पोहोचण्यापूर्वी युवक व दुकानदारांमध्ये दगडफेक झाली. आंदोलनकर्त्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

‘त्यां’ना सरकारी योजनांचा लाभ नाही
बिहारमध्ये आंदोलनकर्त्या युवकांना आगामी काळात विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. आंदोलनात त्यांच्यावर गुन्हा व आरोपपत्र दाखल झाले तर लाभासाठी ते पात्र ठरणार नाहीत. या घटनांमध्ये सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी शेकडो आंदोलकांची ओळख पटविण्यात आली आहे. त्याचबरोबर निमलष्करी दलाच्या १० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड ॲक्शन फोर्सची १, सीआरपीएफच्या ३ व सशस्त्र सीमा दलाच्या ६ कंपन्यांचा समावेश आहे. हिंसा करणाऱ्यांवर आजवर झाली नव्हती, अशा कारवाईचा इशारा दिला आहे. 

एवढ्या तीव्र विरोधाची अपेक्षा नव्हती : नौदलप्रमुख
- अग्निपथ योजनेस एवढ्या तीव्र प्रमाणात विरोध होईल, अशी मला अपेक्षा नव्हती, असे प्रतिपादन नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी केले आहे. हरीकुमार यांनी म्हटले की, अग्निपथ योजनेद्वारे भारतीय लष्करातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा मनुष्यबळ व्यवस्थापन बदल हाेत आहे. 
- या योजनेवर आम्ही जवळपास दीड वर्ष काम केले आहे. मी या नियोजनात सहभागी होतो. ही योजना देश आणि युवक अशा दोघांच्याही हिताची आहे. त्यातून अधिक संधी निर्माण होतील. या योजनेमुळे आता एकाऐवजी चार लोकांना संधी मिळेल.

हरयाणात खाप पंचायतींचे युवकांना समर्थन
हरयाणाच्या महेंद्रगडमध्ये संतप्त युवकांनी एका वाहनाला आग लावली. अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. रेल्वे रुळांवर सामान फेकले व रुळ उखडण्याचाही प्रयत्न केला. राज्यातील खाप पंचायतीही युवकांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. दादरीमध्ये विविध खाप पंचायती व लोक संघटनांनी निदर्शने केली. पिपली, जिंद, रोहतक आणि झज्जरमध्येही आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्ष तरुणांसाेबत : सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या देशभरातील तरुणांना समर्थन देतानाच शांततेचे आवाहन केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात असलेल्या सोनिया गांधी यांनी आंदोलकांना उद्देशून एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारने पूर्णत: दिशाहीन असलेली योजना जाहीर केली आहे. पूर्णत: शांततेत आणि अहिंसक मार्गांनी आंदोलन करा. काॅंग्रेस तुमच्या साेबत आहे.

पंजाबमध्येही पोहोचले आंदोलनाचे लोण 
आंदोलकांनी लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले. रोलिंग हट्सला आगी लावल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. सहा युवकांना ताब्यात घेतले आहे. धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. 

४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाक
आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.

Web Title: Agneepath Protest: Coaching classes behind violent protests in Bihar, evidence in police hands, information obtained from WhatsApp message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.