Agneepath: अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार ठाम, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशभर सुरू करणार भरती रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:48 AM2022-06-20T06:48:16+5:302022-06-20T06:50:45+5:30
Agneepath Scheme: लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
नवी दिल्ली : लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले. सैन्य विभागाचे अवर सचिव लेफ्टनंट जनरल ए. पुरी यांनी स्पष्ट केले की, ही योजना लागू करण्याच्या दिशेने सरकार पुढे पावले टाकत आहे.
पुरी म्हणाले की, सशस्त्र दलांतील वय कमी करण्यावर दीर्घकाळापासून विचार सुरु होता. कारगिल समीक्षा समितीनेही यावर टिप्पणी केली होती. नौदलाच्या योजनेची माहिती देताना व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, नौदल मुख्यालय २५ जूनपर्यंत भरतीसाठी दिशानिर्देश जारी करील. पहिली बॅच २१ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू करील.
एअर मार्शल एस. के. झा म्हणाले की, नोंदणी २४ जून रोजी सुरू होईल. २४ जुलै रोजी ऑनलाइन परीक्षेला सुरुवात होईल. पहिल्या बॅचचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपासून सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. ले. जनरल बन्सी पोनप्पा म्हणाले की, सैन्याकडून सोमवारी अधिसूचना निघेल. भरती रॅली ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशात होईल. ले. जनरल पोनप्पा यांनी सांगितले की, २५ हजार कर्मचाऱ्यांची पहिली बॅच डिसेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात करील; दुसरी बॅच २३ फेब्रुवारीपासून सहभागी होईल. ४० हजार कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी ८३ भरती रॅली आयोजित करण्यात येतील.
हिंसाचारात सहभागींना तिन्ही सेवांची दारे बंद
nलेफ्टनंट जनरल ए. पुरी म्हणाले की, अग्निवीरांबाबत जे नवे निर्णय घेण्यात आले ते हिंसाचारानंतर घेतलेले निर्णय नाहीत. सरकार पूर्वीपासूनच त्यावर विचार करत होते. या हिंसाचारात जे तरुण सहभागी आहेत त्यांना सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्यांना भरती प्रक्रियेत यायचे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यावे लागेल की, ते
अशा कोणत्याही हिंसाचारात सहभागी नव्हते.
nचार वर्षांनंतर ७५ टक्के अग्निवीर सशस्त्र दलातून बाहेर येतील. या मुद्यावर ले. जनरल पुरी म्हणाले की, सैन्याच्या तिन्ही दलातून दरवर्षी १,७६,००० सैनिक वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती घेतात. असे नाही की, अग्निपथ योजनेअंतर्गतच लोक बाहेर पडतील. सैन्यात दरवर्षी ५० ते ६० हजार सैनिकांची भरती करण्यात येते. मात्र, कोरोनामुळे गत दोन वर्षात भरती झालेली नाही.