Agneepath Scheme: “गरज पडल्यास होऊ शकतात बदल..;” अनुराग ठाकुर म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:53 PM2022-06-18T23:53:14+5:302022-06-18T23:53:55+5:30
Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण घेतले आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अनुराग ठाकुर यांनी या योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना हिंसाचार थांबवावा आणि चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
“सरकार खुल्या मनानं त्यांच्या तक्रारी ऐकण्यास आणि आवश्यकता भासल्यास बदल करण्यास तयार आहे. अग्निपथ योजना नरेंद्र मोदी सरकारद्वारे भविष्यात देशाला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि देशातील तरुणांना संधी देण्यासाठी घेण्यात आलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे,” असं अनुराग ठाकुर म्हणाले. टीव्ही ९ समुहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं. ज्या तरुणांना देशाच्या सैन्यदलात सहभागी व्हायचं आहे, ते कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाहीत. परंतु बदल रोखण्याच्या अजेंड्यात असलेल्या राजकीय पक्षांनी तरूणांना उकसवण्याचं काम केलं असल्याचंही ते म्हणाले.
खुल्या मनानं विचार करण्यास तयार
“मी देशातील तरुणांना विनंती करू इच्छितो की हिंसाचाराचा मार्ग तुम्हाला कुठेही नेणार नाही. लोकशाहीत तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्याचा नाही. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही,” असंही अनुराग ठाकुर म्हणाले. जर तुमच्याकडे कोणत्याही चांगल्या सूचना असतील तर त्या लोकशाहीच्या मार्गानं माध्यमांसमोर ठेवू शकता किंवा आम्हाला सांगू शकता. सरकार खुल्या मनानं त्यावर विचार करण्यासाठी सदैव तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.