Agneepath Scheme: "भविष्याची तयारी करावी लागेल", अग्निपथवर पहिल्यांदाच बोलले NSA अजित डोवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:42 PM2022-06-21T14:42:14+5:302022-06-21T14:42:30+5:30
Ajit Doval on Agnipath Scheme: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी अग्निपथ योजनेवर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
NSA Ajit Doval: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेला (Agnipath Scheme) अनेक राज्यांमध्ये तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी अग्निपथ योजना देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले. तसेच, परिस्थितीनुसार बदल आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अग्निपथ योजना भारतासाठी महत्त्वाची का आहे?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अग्निपथ योजनेवर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "देशात जे काही घडत आहे, भविष्यातही तेच घडत राहिले, तर आपण सुरक्षित राहणार नाहीत. त्यामुळेच आपल्याला चांगल्या भविष्यासाठी आजच तयारी करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला बदलाव करावाच लागेल. अग्निपथ योजना देशासाठी अतिशय आवश्यक आहे."
#WATCH LIVE | NSA Ajit Doval speaks to ANI's Smita Prakash on the #AgnipathRecruitmentScheme and other internal security issues https://t.co/DJ87xXO8j9
— ANI (@ANI) June 21, 2022
'देशाची सुरक्षा ही मोदींची प्राथमिकता'
अग्निपथ योजनेवर पुढे बोलताना NSA अजित डोवाल म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिकता देशाची सुरक्षा आहे. भविष्यातील युद्ध वेगळ्या पद्धतीने होतील. आपण संपर्करहित युद्धाकडे वाटचाल करत आहोत आणि अदृश्य शत्रूविरुद्धही युद्ध करणार आहोत. तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आपल्याला बदल करावाच लागेल."
'अग्निपथच्या रोलबॅकचा प्रश्नच नाही'
अग्निपथ योजनेच्या रोलबॅकच्या प्रश्नावर अजित डोवाल म्हणाले की, ही योजना रोलबॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याआधी लष्कर विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनीही अग्निपथ योजना मागे घेण्यास नकार दिला होता.