Agneepath: बहीण BSFमध्ये, वडील TRSचे नेते, स्वत: करत होता लष्कर भरतीची तयारी, गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:49 PM2022-06-18T13:49:36+5:302022-06-18T13:50:29+5:30
Agneepath: तेलंगणामधील सिकंदराबाद येथे अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करताना झालेल्या गोळीबारात दमेरा राकेश या तरुणाचा मृत्यू झाला होता. राकेश हा तेलंगाणामधील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याची बहीण ही बीएसएफमध्ये सेवेत आहे.
हैदराबाद - तेलंगणामधील सिकंदराबाद येथे अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करताना झालेल्या गोळीबारात दमेरा राकेश या तरुणाचा मृत्यू झाला होता. राकेश हा तेलंगाणामधील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याची बहीण ही बीएसएफमध्ये सेवेत आहे. तर त्याचे वडील टीआरएसचे नेते असून, ते शेती करतात. या घटनेनंतर तेलंगाणामधील राजकारण तापले आहे.
दमेरा राकेश याचे वडील दमेरा कृष्णास्वामी आणि आईचं नाव पुल्लम्मा आहे. राकेशची मोठी बहीण राणी बीएसएफमध्ये सेवेत आहे. राकेशचीही लष्करातील भरतीसाठी शारीरिक चाचणी पूर्ण झाली होती. तसेच त्याने लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली होती. तो गेल्या तीन वर्षांपासून सेनेच्या परीक्षेची तयारी करत होता. राकेशने डिग्री पूर्ण केल्यावर वारंगलमध्ये तो कोचिंग करत होता. त्याला बहीण प्रेरणा देत होती. त्यामुळे राकेशनेही लष्करात जाण्यासाठी तयारी सुरू केली होती. राकेश हा शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे वडील दमेरा कुमारस्वामी शेतकरी समन्वय समितीचे समन्वयक आहेत. तसेच ते टीआरएसचे नेते आहेत. आता राकेशवर वारंगल येथे अंत्यसंस्कार केले जातील.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच जाळपोळ झाली. शुक्रवारी संध्याकाळी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर शेकडो आंदोलकांनी गोंधळ घातल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात राकेशचा मृत्यू झाला होता. तसेच काही जण जखमी झाले होते. दरम्यान, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राकेशच्या मृत्यूसाठी केंद्र सरकारच्या सदोष धोरणाला जबाबदार ठरवले आहे.
दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी राकेशच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच राकेशच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.