Agneepath: ...म्हणून भडकला ११ राज्यांत हिंसाचार, याच राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून होते ९५% जवानांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 08:24 AM2022-06-18T08:24:09+5:302022-06-18T08:24:43+5:30

Agneepath Scheme Protest: देशातील सैन्यदलात ९५ टक्के जवान हे केवळ ९ राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून निवडले जातात. अग्निपथ योजनेला बहुतांश हिंसक विरोध हीच राज्ये व जिल्ह्यांतून होत आहे. येथे मागील दोन वर्षांच्या कालावधीत युवकांना सैन्यदलात भरतीची एकदाही संधी मिळाली नाही. 

Agneepath: Violence erupted in 11 states | Agneepath: ...म्हणून भडकला ११ राज्यांत हिंसाचार, याच राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून होते ९५% जवानांची भरती

Agneepath: ...म्हणून भडकला ११ राज्यांत हिंसाचार, याच राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून होते ९५% जवानांची भरती

Next

- शरद गुप्ता
नवी दिल्ली : देशातील सैन्यदलात ९५ टक्के जवान हे केवळ ९ राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून निवडले जातात. अग्निपथ योजनेला बहुतांश हिंसक विरोध हीच राज्ये व जिल्ह्यांतून होत आहे. येथे मागील दोन वर्षांच्या कालावधीत युवकांना सैन्यदलात भरतीची एकदाही संधी मिळाली नाही. 
संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधाचे मुख्य कारण या योजनेतील फारच कमी कालावधी, रेजिमेंट व्यवस्थेचा अभाव व वयोमर्यादा दोन वर्षे कमी करणे हे आहे. विद्यमान पिढीमध्ये चार वर्षांचा असा कालावधी आला की, ज्यात त्यांना सैन्य दलात भरतीची एकही संधी मिळाली नाही. 

रेजिमेंटचे मूळ चरित्र गायब
प्रत्येक रेजिमेंटवर भरतीसाठी विशेष क्षेत्र किंवा जातीसाठी वेगळी तरतूद असते. परंतु, अग्निपथ योजनेत कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. सैन्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे हळूहळू रेजिमेंट आपले मूळ चरित्र गमावेल व देशाच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करू लागेल. 
६ महिने प्रशिक्षण, ४ वर्षे काम
सहा महिने प्रशिक्षणानंतर चार वर्षे काम हा  कमी कालावधी आहे. ना सैनिक आपल्या रेजिमेंटशी एकरूप होतो ना रेजिमेंट त्या सैनिकाच्या कार्यपद्धतीवर गर्व करू शकेल. 

निवृत्तीनंतर काय? 
कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर बाहेर पडलेल्या युवकांना पर्यायी रोजगाराची व्यवस्था स्पष्ट न झाल्यामुळे खऱ्या अर्थाने युवकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. ही योजना एक किंवा दोन जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली तर कदाचित यातील उणिवा समोर येऊ शकतील. त्यानंतर योजना औपचारिकरीत्या लागू करण्यापूर्वी त्यातील उणिवा कमी केल्या जाऊ शकतात. 

रेजिमेंट व्यवस्थेचा अभाव ही यातील फार मोठी उणीव आहे. सैन्यदलात नाम, नमक व निशाण सर्वात महत्त्वाचे असते. सैनिक आपल्या रेजिमेंटमध्ये प्रदीर्घ कालावधीत काम केल्यानंतर त्याला आपले दुसरे घरच मानतात.     - मेजर जनरल अजय कुमार दत्ता, संरक्षण तज्ज्ञ 

केंद्राचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न
 नवी दिल्ली :  लष्करात चार वर्षांसाठी भरती करावयाच्या अग्निपथ योजनेवरून देशातील युवकांचा विरोध वाढत असताना केंद्र सरकारने यावर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अग्निवीरांच्या भरतीसाठी असलेली वयोमर्यादा २ वर्षांनी वाढविली आहे. यासंदर्भात दोन दिवसांत अधिसूचना जारी होईल, असे लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी म्हटले आहे. अग्निपथ याेजनेंतर्गत हवाई दलाची भरतीप्रक्रिया २४ जूनपासून सुरू हाेईल, असे हवाईदल प्रमुख हवाईदल प्रमुख विवेक चाैधरी यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ  सिंह यांनी तिन्ही सैन्यदलाच्या उपस्थितीमध्ये या योजनेची घोषणा गेल्या मंगळवारला केली, परंतु दुसऱ्या दिवसापासून या योजनेला युवकांचा विरोध सुरू झाला. गुरुवारपासून या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने केंद्र सरकारने लगेच या मुद्यावरून युवकांमध्ये असलेला असंतोष निवळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राहुल गांधी यांचा पंतप्रधान माेदींवर निशाणा
अग्निपथ योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांना आपल्या मित्रांच्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नाही. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, अग्निपथ - तरुणांना नाकारले, कृषी कायदा - शेतकऱ्यांना नाकारले, नोटबंदी - अर्थतज्ज्ञांना नाकारले, जीएसटी - व्यापाऱ्यांना नाकारले. त्यांनी आरोप केला की, देशातील जनतेला काय हवे आहे ते पंतप्रधानांच्या लक्षात येत नाही. कारण त्यांना मित्रांच्या आवाजाशिवाय काही ऐकू येत नाही.

योजना तत्काळ मागे घ्या : प्रियांका गांधी 
ही योजना तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, २४ तासांच्या आत भाजप सरकारला सैन्य भरतीचा नियम बदलावा लागला. ही योजना घाईघाईत तरुणांवर लादली जात आहे. योजना तत्काळ मागे घ्यावी. हवाई दलातील थांबलेल्या भरतीत नियुक्त्या द्या. वयोमर्यादेत सूट देऊन सैन्य भरती पूर्वीप्रमाणेच करा.

१८ जून रोजी बिहार बंद
nसैन्य भरतीच्या नव्या प्रक्रियेविरुद्ध रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी १८ जून रोजी बिहार बंदची हाक दिली आहे. या संघटनांनी केंद्र सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने ही योजना परत घेतली नाही तर भारत बंदचा इशारा देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला
- आंदोलकांकडून आता भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. बेतियामध्ये उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी हल्ला केला. त्यांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा तोडल्या. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. घर जाळण्याचा प्रयत्न केला. 
- भाजपचे आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर हल्ला केला. वाहनाच्या काचा फोडल्या. आंदोलकांचे म्हणणे होते की, केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती म्हणजे, रोजगाराच्या अधिकारावर गदा आहे. सैन्यात आमदार, खासदार यांची मुले नाहीत तर गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत. सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहे. ते आम्ही सहन करणार नाही.

युवकांच्या भविष्यासाठी
- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात युवकांनी भावनेच्या भरात येऊन कोणतेही कृत्य करू नये. अग्निपथ योजना युवकांसाठी चांगली आहे. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

युवकांनी योजना समजून घ्यावी - मनोज पांडे
-अग्निवीर म्हणून भरतीसाठी वयोमर्यादा आता दोन वर्षांनी वाढविली आहे. या संदर्भात दोन दिवसांत अधिसूचना जारी होईल, असे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी म्हटले आहे. युवकांनी या योजनेची सर्व माहिती आधी जाणून घ्यावी, असे आवाहन मनोज पांडे यांनी केले आहे. 

Web Title: Agneepath: Violence erupted in 11 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.