'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:01 PM2022-06-17T13:01:03+5:302022-06-17T19:06:21+5:30

Agnipath Protests: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत.

Agnipath Protests:Oppose to 'Agneepath scheme'; Attack on Bihar's Deputy CM's house, violent protests in 11 states | 'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आहेत. तर, भाजप नेत्यांच्या घरावर हल्लेही होत आहेत. आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घराची तोडफोड केली. याशिवाय सासाराम येथील भाजप नेते संजय जयस्वाल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे.

अनेक जिल्ह्यात विरोध
अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्याचा विरोध सुरू झाला आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून होत आहे. आज सकाळपासून बिहारमधील लखीसराय, बेगुसराय, हाजीपूर, मुंगेर, खगरिया, औरंगाबाद, समस्तीपूर आणि बेतियासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर टायर जाळले. चार ठिकाणी गाड्यांना आग लावण्याचेही वृत्त आहे.


अनेक ट्रे रद्द
उत्तर प्रदेशातील बलिया येथेही एका ट्रेनला आग लावण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. हरियाणातील नारनौलमध्ये आंदोलकांनी जिल्हा उपायुक्तांच्या घरासमोर निदर्शने केली. त्याच्या घरावरही दगडफेक करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी आंदोलकांनी केवळ रस्तेच रोखले नाहीत तर रेल्वे ट्रॅकही अडवले. रुळांवर टायर जाळण्यात आले आणि अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. रेल्वेने सांगितले की, विरोधामुळे 34 गाड्या रद्द कराव्या लागल्या, त्यापैकी 29 प्रवासी गाड्या होत्या. तर 72 गाड्या उशिराने धावत आहेत. आजही 38 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यूपी-बिहार ते एमपी-राजस्थान-तेलंगाणापर्यंत निदर्शने
केंद्राच्या या नवीन अग्निपथ योजनेचा देशभरातून विरोध होताना दिसत आहेत. याची सुरुवात बिहारमध्ये झाली, आता देशभरातील 11 राज्यांमध्ये या योजनेविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. बिहार येथे सर्वाधिक हिंसक निदर्शने होत आहेत. या पाठोपाठ उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि तेलंगाणा राज्यातील अनेक भागात हिंसक आंदोलन होत आहे.

सरकारने वयोमर्यादा वाढवली आहे
अग्निपथ योजनेला विरोध करण्याची दोन मोठी कारणे समोर येत आहेत. सर्वप्रथम, या अंतर्गत केवळ 4 वर्षे सैन्यात सेवा करण्याची संधी असेल. आणि दुसरे म्हणजे यात पेन्शनची तरतूद नाही. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने रात्री उशिरा अग्निवीरांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 23 वर्षे केली. ही सवलत यंदाही कायम राहणार आहे. म्हणजेच या वर्षी 17.5 ते 23 वर्षे वयोगटातील तरुण अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अग्निपथ योजनेत या सुविधा मिळणार...
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येणार आहे. यंदा 46 हजार तरुणांची भरती होणार आहे. या वर्षी वयोमर्यादा 17.5 ते 23 वर्षे असेल, तर पुढील वर्षापासून ही मर्यादा 21 वर्षांपर्यंत असेल. योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना 'अग्नवीर' म्हटले जाईल. अग्निवीरांना दरमहा 30 हजार रुपये पगार मिळणार आहे. हा पगार दरवर्षी वाढणार असून चौथ्या वर्षी पगार दरमहा 40 हजार रुपये होणार आहे. याशिवाय अग्निवीरांना 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. सेवेदरम्यान शहीद झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास 44 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाईल. चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के तरुण सैन्यात कार्यरत राहतील. त्यांना आणखी 15 वर्षे सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या दरम्यान, त्यांना दलांचे कायदे आणि अटी लागू होतील.

Web Title: Agnipath Protests:Oppose to 'Agneepath scheme'; Attack on Bihar's Deputy CM's house, violent protests in 11 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.