2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:26 PM2022-06-16T12:26:58+5:302022-06-16T12:28:36+5:30
Agnipath scheme: लष्कराचे उपप्रमुख जनरल बी.एस. राजू यांनी सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार नाही.
नवी दिल्ली: सध्या देशात सर्वत्र केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची चर्चा आहे. या योजने अंतर्गत तरुणांना सैन्यात सेवेची संधी मिळेल. यासोबतच त्यांना चांगला पगारही मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात लष्करी आघाडीवर देशाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या या योजनेनुसार, 2030-32 पर्यंत 12 लाख जवानांपैकी निम्मे जवान 'अग्नवीर' असतील. या योजनेंतर्गत भरती झालेल्या लोकांना 'अग्नवीर' असे नाव देण्यात आले आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लेफ्टनंट जनरल बीएस राजू म्हणाले, 'या योजनेअंतर्गत दरवर्षी भरतीची संख्या वाढवली जाईल. यावर्षी 40 हजार लोकांचा त्यात समावेश होणार आहे. सातव्या आणि आठव्या वर्षापर्यंत त्याची संख्या 1.2 लाखांपर्यंत पोहोचेल. तर दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या 1.6 लाखांवर पोहोचेल.
15 वर्षांपर्यंत नोकरीची संधी
या योजनेअंतर्गत यावर्षी हवाई दल आणि नौदलात 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येथेही वर्षानुवर्षे भरतीचे प्रमाण वाढणार आहे. अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील केवळ 25 टक्के चांगल्या सैनिकांना पुढील 15 वर्षांसाठी नियमित केडरमध्ये सामील करून घेतले जाईल. तर उर्वरित 75 टक्के चार वर्षांनंतर निवृत्त केले जातील.
लष्कराचे सरासरी वय वाढेल
लष्कराचे उपप्रमुख बीएस राजू यांच्या मते, या योजनेमुळे लष्कराचा फिटनेसही वाढेल. सध्या लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत खाली येईल.
'योजनेने नुकसान होणार नाही'
या योजनेतून भरती झाल्यानंतर तरुणांचा सैन्यातील उत्साह आणि जोश कमी होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. कारण त्यांची भरती केवळ चार वर्षांसाठी असेल. देशात बेरोजगारी वाढू शकते, असेही काही लोक म्हणत आहेत. किंबहुना, दर चार वर्षांनी सुमारे 75 टक्के लोकांना कामावरून कमी केले जाईल. मात्र, बीएस राजू या दाव्यांचे खंडन करतात.