भाजपा खासदारानं कापला संसदेची प्रतिकृती असलेला केक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 01:40 PM2018-09-23T13:40:18+5:302018-09-23T13:41:28+5:30
सोशल मीडियावर फोटो व्हायरल; विरोधकांची सडकून टीका
आग्रा: अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि आग्र्याचे भाजपाखासदार डॉ. रामशंकर कठेरिया यांनी त्यांच्या जन्मदिनी संसदेची प्रतिकृती असलेला केक कापला आहे. त्यांच्या या कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियानं कठेरियांवर टीकेची झोड उठवली आहे. संसदेची प्रतिकृती असलेला केप कापत असतानाचा कठेरिया यांचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी रामशंकर कठेरिया यांचा 54 वा वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांनी तब्बल 54 किलोंचा केक कापला. या केकवर संसदेची प्रतिकृती होती. केकवरील संसदेवर तिरंगादेखील लावण्यात आला होता. मात्र केक कापण्याआधी तो काढण्यात आला. संसद भवन, त्यासमोरील रस्ता, त्यावरुन जाणाऱ्या गाड्या, आसपासची हिरवळ केकवर दाखवण्यात आली होती. कठेरिया यांनी केक कापल्यानंतर त्यांच्या एका समर्थकानं केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा फोटो व्हायरल झाला.
संसदेची प्रतिकृती असलेला केक कापल्यानं सोशल मीडियानं कठेरियांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांनीदेखील कठेरिया यांच्या या कृतीचा चांगलाच समाचार घेतला आहे. कठेरिया यांना राष्ट्रचिन्हाविषयीच आदर नाही. त्यामुळे त्यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनंही कठेरियांचा निषेध केला आहे. भाजपानं कठेरियांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे.