शाळा, कुटुंबाच्या ‘प्रगती’साठी दुसरीच्या मुलाचा घेतला ‘बळी’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 09:46 AM2024-09-28T09:46:33+5:302024-09-28T09:46:49+5:30
शाळा चालक, संचालकांसह मुख्याध्यापक, दोन शिक्षकांना अटक
आग्रा (उ.प्र.) : अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे दुसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याला जीव गमवावा लागला. शाळेच्या समृद्धीसाठी शाळेचे चालक, संचालक त्याला नरबळीच देणार होते, परंतु त्याला अचानक जाग आल्याने त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. हा खळबळजनक प्रकार हाथरस येथे घडला असून, चालक, संचालकासह ५ जणांना अटक करण्यात आली.
बालकाच्या हत्येप्रकरणी शाळा चालक, संचालकांसह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना अटक करण्यात आली. या बालकाच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले की त्याचा खून गळा दाबून करण्यात आला. डी.एल. पब्लिक स्कूलचा मालक जसोधन सिंह याचा मंत्रतंत्रावर विश्वास होता. त्याने मुलगा व शाळेचा संचालक दिनेश बघेल याला शाळेच्या आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी एक बालक बळी देण्याचा सल्ला दिला होता.
गुन्हा दाखल; रवानगी झाली थेट तुरुंगात
मुख्याध्यापक लक्ष्मण सिंह आणि रामप्रकाश सोळंकी, वीरपाल सिंह या दोन शिक्षकांनाही अटक झाली आहे.
त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१ ) नुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
मृत बालकाचे नाव कृतार्थ कुशवाह असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोककुमार सिंह यांनी सांगितले.
अशी घडली घटना...
२३ सप्टेंबर रोजी वसतिगृहातून शिक्षक सोळंकी, दिनेश बघेल आणि जसोधन सिंह यांनी कृतार्थचे अपहरण केले. त्यांनी त्याला ठरलेल्या ठिकाणी बळी देण्यासाठी नेले; परंतु अचानक मुलाला जाग आली आणि तो रडू लागला. आपली योजना फिसकटली या भीतीने आरोपींनी मुलाचा गळा घोटला.
निष्पाप बालक पाहूनही त्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. दुसरा शिक्षक वीरपाल सिंह, मुख्याध्यापक लक्ष्मण सिंह हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
आरोपींनी कृतार्थला बरे नसल्याने कारमधून रुग्णालयात नेत असल्याचे मुलाच्या पालकांना सांगितले. परंतु, त्यांनी कार रोखत पोलिसांना माहिती दिली. शाळा आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी मुलाचा बळी देण्यासाठी हत्या करण्यात आली, अशी कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.