कर्तव्यनिष्ठेला सलाम! जन्मताच श्वास थांबलेल्या बाळाला डॉक्टरांनी दिलं जीवदान; असा झाला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:17 PM2022-03-14T19:17:51+5:302022-03-14T19:24:44+5:30
डॉक्टरांच्या या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनीच सलाम केला असून सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
नवी दिल्ली - डॉक्टर नेहमीच सर्वांसाठी देवदूत ठरतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जन्मताच श्वास थांबलेल्या बाळाला डॉ़क्टरांनी जीवदान दिलं आहे. मृत्यूच्या दाढेतून बाळाचा जीव परत आणला आहे. श्वास थांबलेल्या या बाळाला काही मिनिटांतच जिवंत केलं आणि चमत्कार झाला. डॉक्टरांच्या या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनीच सलाम केला असून सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. या घटनेने बाळाच्या पालकांसोबतच सर्वांना सुखद धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एत्मादपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रातील ही घटना घडली आहे. खुशबू नावाची महिला येथे डिलिव्हरीसाठी आली होती. तिने एका बाळाला जन्म दिला. पण बाळ जन्मानंतर रडत नव्हतं. त्याचा श्वासोच्छवासही होत नव्हता. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू झाली. त्याला कृत्रिम ऑक्सिजनने श्वास देण्यात आला. इतर प्रयत्नही करण्यात आले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.
अखेर या महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या डॉ. सुरेखा यांनी बाळाला आपल्या तोंडाने आपला श्वास द्यायला सुरुवात केली. बाळ रक्ताने माखलेलं होतं, त्याला स्वच्छही कऱण्यात आलं नव्हतं. असं असताना डॉ. सुरेखा यांनी दुसरा कोणताच विचार केला नाही. त्यांना फक्त बाळाचा जीव वाचवायचा होता. अखेरच त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. बाळात जीव आला, ते स्वतःहून श्वास घेऊ लागलं.
बाळामध्ये आपला जीव ओतणाऱ्या डॉ. सुरेखा यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. यावेळी तिथं उपस्थित असलेला आरोग्य केंद्रातील स्टाफही थक्क झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याचा एक व्हिडीओ देखील तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओ पाहिल्यानंतर या डॉक्टरचं कौतुक केलं जातं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.