Corona Virus : बापरे! आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा; कोरोना रुग्णांना दिलं एक्सपायर झालेलं औषध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 03:13 PM2022-07-12T15:13:27+5:302022-07-12T15:27:43+5:30
Corona Virus : आरोग्य विभागाने कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी औषधांचं किट त्यांच्या घरी पाठवलं. कुटुंबाने जेव्हा ते किट उघडून पाहिलं तेव्हा त्यामध्ये एका औषधाच्या एक्सपायरीची तारीख ही नऊ महिन्यांआधीची होती.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,615 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 525474 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोना रुग्णांना एक्सपायर झालेलं औषध देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील एक कॉलनीत राहणाऱ्या कुटुंबातील पाच लोक रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी औषधांचं किट त्यांच्या घरी पाठवलं. कुटुंबाने जेव्हा ते किट उघडून पाहिलं तेव्हा त्यामध्ये एका औषधाच्या एक्सपायरीची तारीख ही नऊ महिन्यांआधीची होती. तर इतर औषधांवर माहिती दिलेली असते तो भाग कापलेला आढळून आला. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी बाहेरून औषध मागवून आपले उपचार सुरू केले. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणाचा रुग्णांना सामना करावा लागत आहे. कोरोनाग्रस्त कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाकडून औषधं देण्यासाठी पाच-सहा फोन आले.
आरोग्य विभागाने त्यानंतर औषधांचं किट घरी पाठवून दिलं. ते उघडून पाहिल्यावर एजीथ्रोमाइसिन टॅबलेटवर बॅच नंबर एजेड्यू 525 मॅन्युफॅक्चरिंग 11/2019 आणि एक्सपायरी तारीख 10/2021 पाहायला मिळाली. त्यांनी तातडीने सीएमओ कार्यालयाला याबाबत माहिती दिली. यानंतर त्यांच्याकडून ते औषध परत घेण्यात आलं. कुटुंबाने मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर देखील याबाबत तक्रार केली आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.