बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:20 PM2024-05-20T14:20:40+5:302024-05-20T14:29:26+5:30
आग्रा येथील एका व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 53 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या पलंग आणि गाद्यांमध्येही पैसा लपवून ठेवला असून, ते मोजण्यासाठी अनेक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. सध्या आयकर विभागाची कारवाई सुरू आहे.
आयकर विभागाने मुख्यतः हरमिलाप ट्रेडर्स आणि त्यांच्याशी व्यावसायिक संबंध असलेल्या एमजी रोड स्थित बीके शूज, धाकरन येथील मंशू फूटवेअर यांसारख्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. हरमिलाप ट्रेडर्सच्या मालकाच्या घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
छापेमारीत आयकर विभागाने अशा स्लिप्स जप्त केल्या आहेत ज्यामध्ये लाखो, कोट्यवधींचा व्यवहार झाला होता. या स्लिप्स दिसू लागल्याने शहरातील उर्वरित व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. या स्लिपमध्ये इतर व्यापाऱ्यांसोबतच्या व्यवहारांची माहिती असते. ज्याच्या आधारे आयकर विभाग उर्वरित व्यापाऱ्यांच्या उलाढालीचे मूल्यांकन करू शकतं.
या व्यवसायात स्लिपद्वारे रोख रक्कम दिली जाते. कानपूरमध्ये सात मे रोजी मतदान असल्याने स्लिप्स कॅश करता आल्या नाहीत आणि त्या आयकर विभागाने पकडल्या. निवडणुकीनंतर, स्लिप्सची पूर्तता आणि कर फसवणुकीच्या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या, त्यानंतर अधिकाऱ्यांना वाटले की कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे. या छाप्यात स्लिपच्या माध्यमातून होणारी कर फसवणूक उघडकीस आली आहे.
सध्या आयकर विभागाने काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रिअल इस्टेट आणि जमिनीच्या मोठमोठ्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही सापडली आहेत. आयकर विभागाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह सहाहून अधिक नोट मोजणी यंत्रे मागवली आहेत. टीम रविवारी रात्रभर नोटा मोजत राहिली.