"शुभमला ज्या खांद्यावर घेऊन नाचलो त्याच खांद्यावरुन आता..."; शहीद जवानाच्या भावाचे पाणावले डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 18:08 IST2023-11-23T18:00:19+5:302023-11-23T18:08:52+5:30
शुभम यांच्या भावाने देखील पाणावलेल्या डोळ्यांनी वाढदिवसाचा किस्सा सांगितला. वाढदिवसाला अनेकांशी शुभम यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती.

फोटो - आजतक
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कॅप्टन शुभम गुप्ता यांचे पार्थिव आज त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. शुभम गुप्ता शहीद झाल्याची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. वडील बसंत गुप्ता यांनी सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी त्यांचं शुभम यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी शुभम यांनी एक काम बाकी आहे, ते पूर्ण करण्यासाठी लवकरच परत येईन असं सांगितलं.
शुभम यांच्या भावाने देखील पाणावलेल्या डोळ्यांनी वाढदिवसाचा किस्सा सांगितला. वाढदिवसाला अनेकांनी शुभम यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. 9 ऑक्टोबरला शुभम यांचा वाढदिवस होता. त्यावेळी ते घरीच होते. वाढदिवसाला संपूर्ण कुटुंब जमलं होतं. हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात केक कापण्यात आला. सर्वांनी शुभम यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
पार्टीत 'तुम जीयो हजारों साल...' हे गाणं वाजत होतं. त्यावेळी शुभम यांना खांद्यावर घेऊन भावांनी आनंद साजरा केला. पण ज्या खांद्यावर घेऊन ते नाचले त्याच खांद्यावरून आता शुभम यांना अखेरचा निरोप द्यावा लागणार आहे. आधी दहशतवाद्यांशी लढताना शुभम गुप्ता जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यानंतर शहीद झाल्याचं समजलं. शुभम शहीद झाल्याची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
शुभम गुप्ता यांच्या वडिलांनी सांगितलं की, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. देशासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिलं आहे. शुभम यांचे कुटुंबीय यावर्षी त्यांच्या लग्नाची तयारी करत होते, पण याच दरम्यान शुभम शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. दोन कॅप्टनसह चार जवान शहीद झाले आहेत.