हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 03:19 PM2024-05-12T15:19:14+5:302024-05-12T15:27:49+5:30
88 वर्षांच्या विद्या देवी आग्रा येथील कमला नगरच्या रहिवासी आहेत. त्यांना चार मुलं असून ते चौघेही करोडपती आहेत. प्रत्येकाकडे आलिशान बंगले, नोकर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र कोणाच्याच घरात आईसाठी जागा नाही.
आज सर्वत्र मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 88 वर्षांच्या विद्या देवी आग्रा येथील कमला नगरच्या रहिवासी आहेत. त्यांना चार मुलं असून ते चौघेही करोडपती आहेत. प्रत्येकाकडे आलिशान बंगले, नोकर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र कोणाच्याच घरात आईसाठी जागा नाही. विद्या देवी गेल्या 2 वर्षांपासून आग्रा येथील रामलाल वृद्धाश्रमात राहत आहेत.
विद्या देवी या आग्रा येथील प्रसिद्ध नेत्र रुग्णालयाचे संस्थापक गोपीचंद अग्रवाल यांच्या पत्नी आहेत. गोपीचंद यांची गणना शहरातील अब्जाधीशांमध्ये होते. चारही मुलांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभं करून सर्वांचं लग्न लावून दिलं. 14 वर्षांपूर्वी गोपीचंद यांचं निधन झालं त्यानंतर विद्या देवी यांचं आयुष्य बदलू लागलं. मुलांनी मालमत्ता वाटून घेतली आणि वृद्ध आईला एकटं सोडलं.
विद्या देवी म्हणतात की, देवाने असं कोणासोबतही होऊ देऊ नये. पूर्ण कुटुंब असूनही वृद्धाश्रमात राहावं लागतं. गेल्या दोन वर्षांपासून कोणीही त्या जिवंत आहेत की नाही हे देखील पाहिलं नाही. 10 वर्षांपासून दोन मुलांशी बोलले नाहीत. कधी कधी नातू येतो आणि फक्त 5000 रुपये देऊन निघून जातो.
विद्या देवी यांनी देवाने अशी मुलं कोणाला देऊ नयेत असं म्हटलं आहे. लग्नानंतर मुलं बदलली. सूनही योग्य काळजी घेत नाही. शिव्या देते. एक मुलगी आहे, तिनेही पाठ फिरवली आहे. नातवंडांचे चेहरे पाहण्याची इच्छा असते. आता शरीरही सहकार्य करत नाही. अलीकडे पडल्यामुळे माझ्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असं म्हटलं आहे. विद्या देवी आता परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. त्यांनी वृद्धाश्रम हे आपलं घर म्हणून स्वीकारलं आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.