निर्णय मान्य करा नाहीतर बाहेर पडा, नितीश कुमारांचा शरद यादवांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 04:28 PM2017-08-11T16:28:10+5:302017-08-11T16:41:56+5:30
एकमत झाल्यानंतरच भाजपाशी हातमिळवणी करण्याचा पक्षाने निर्णय घेतला असून, शरद यादव यांना निर्णय पटत नसेल तर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे आहेत असं सूचक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे
नवी दिल्ली, दि. 11 - एकमत झाल्यानंतरच भाजपाशी हातमिळवणी करण्याचा पक्षाने निर्णय घेतला असून, शरद यादव यांना निर्णय पटत नसेल तर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे आहेत असं सूचक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे. आपल्या सहका-याला शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचंही नितीश कुमार बोलले आहेत. नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली. भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यासंबंधी वक्तव्य केलं आहे.
Party has taken a decision with everyone's consensus, he is free to make his own decisions: Bihar CM Nitish Kumar on Sharad Yadav pic.twitter.com/LHpb2ZvnXm
— ANI (@ANI) August 11, 2017
दरम्यान जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली होती. शरद यादव यांनी राज्याचा दौरा सुरु केला असून आपण लोकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं होतं. बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले शरद यादव यांनी पहिल्यांदाच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, 'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला आहे'.
Discussed developmental issues, will come in the end of August to discuss about development of Bihar at length: Bihar CM after meeting PM pic.twitter.com/GwancHymYj
— ANI (@ANI) August 11, 2017
शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त येत होतं. आरजेडीसोबत आपली मैत्री संपवत भाजपाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे वाटचाल सुरु केल्याने शरद यादव नितीश कुमारांवर नाराज आहेत. दरम्यान शरद यादव जेडीयूमधून वेगळे होऊन आपला पक्ष उभा करतील अशा बातम्याही येत होत्या. जाणकारांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करु शकतात.
'ज्या जनतेसोबत आम्ही युती केली होती, त्यांच्यासोबत आम्ही करार केला होता,तो ईमानदारीने वागण्याचा होता. तो करार तुटला आहे, ज्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे', असं शरद यादव बोलले होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 'निवडणुकीत एक जाहीरनामा जेडीयूचा होता, तर एक जाहीरनामा भाजपाचा होता. गेल्या 70 वर्षात असं कोणतंच उदाहरण पहायला मिळत नाही ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहीरनाम्यासहित पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली, आणि आता ते जाहीरनामे एकत्र झाले आहेत'. 'लोकशाहीवर विश्वासाचं संकट असून, यावर लोकांमध्ये जाऊन चर्चा करणार असल्याचं', शरद यादव यांनी सांगितलं होतं.