जपानच्या १३ उद्योगांशी करार
By Admin | Published: April 19, 2016 12:38 AM2016-04-19T00:38:37+5:302016-04-19T00:51:40+5:30
औरंगाबाद : दलित इंडस्ट्रीज चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) सभासद असणाऱ्या राज्यांतील १३ उद्योगांनी जपानच्या उद्योगांशी सामंजस्य करार केला
औरंगाबाद : दलित इंडस्ट्रीज चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) सभासद असणाऱ्या राज्यांतील १३ उद्योगांनी जपानच्या उद्योगांशी सामंजस्य करार केला असून, व्यवसाय वृद्धीसाठी त्याचा फायदा होईल, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
जपान-इंडिया बिझनेस मास्टर्स फोरमच्या मध्यस्थीने ‘डिक्की’ आणि जपानच्या उद्योगांची औरंगाबादेत रविवारी बैठक झाली. त्यात ‘डिक्की’चे सभासद असणाऱ्या राज्यांतील १३ उद्योगांनी जपानच्या उद्योगांशी सामंजस्य करार केले. व्यवसाय वृद्धीसाठी मदत, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करणे, यासाठी जपानचे उद्योग मदत करणार आहेत. आगामी काळात अशा प्रकारचे आणखी ५० सामंजस्य करार होतील, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. ‘डिक्की’चे उत्तर भारत अध्यक्ष संजीव डांगी, मराठवाडा अध्यक्ष मनोज आदमाने यावेळी उपस्थित होते.
सुपर्रब हौसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, डांगी असोसिएटस्, फ्रीडम बियाँड सोल्युशन, इम्पिरिटिव्ह इंडिया, धन्वंतरी बायोमेडिसीज, बिझक्राफ्ट, तेजयोग आयुर्वेद अँड स्पा आदी उद्योगांचा जपानच्या उद्योगांशी सामंजस्य करार करणाऱ्यांत समावेश आहे. इंडो-जपान बिझनेस मास्टर्स फोरमचे कार्यालयही औरंगाबादेत स्थापन करण्यात आले आहे.‘डिक्की’च्या सभासदांना अधिकाधिक संधी मिळवून देण्यासाठी सुविधा केंद्र म्हणून हे कार्यालय काम करील, असे कांबळे यांनी सांगितले.