मोठी बातमी! मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार 'सुपर अॅप'; सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:44 PM2022-03-29T17:44:26+5:302022-03-29T17:45:03+5:30
केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी एक सुपर अॅप (Super App For Farmers) लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी एक सुपर अॅप (Super App For Farmers) लॉन्च करण्याची योजना आखत आहे. शेतकऱ्यांना त्यांचं पीक, उत्पादन, कापणीनंतरचं व्यवस्थापन, हवामान आणि बाजारातील अपडेट्स यासंदर्भातील सर्व सुविधा एकाच जागी उपलब्ध करुन देणं हा यामागचा उद्देश असणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना याच अॅपमधून सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या योजना, घोषणा आणि अॅडव्हायजरींची माहिती देखील मिळणार आहे. यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून वेगानं काम सुरू आहे.
स्मार्टफोनची उपलब्धता आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता सरकारनं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक अॅप लाँच केले आहेत. यातील प्रत्येक अॅप एखाद्या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रीय करुन तयार करण्यात आलेले आहेत. अशावेळी वेगवेगळ्या विषयांसाठी आणि कामांसाठी वेगवेगळे अॅप वापरण्याऐवजी एकच सर्वसमावेशक अॅप असावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. एकाच अॅपमुळे शेतकऱ्यांनाही सोयीचं ठरेल आणि अनेक अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही.
कृषी क्षेत्रातील सर्व माहिती एकाच ठिकाणी
शेतकऱ्यांना रिसर्च, हवामान, बाजारातील अपडेट्स, सरकारी योजना, कृषी सेवा आणि देशातील विविध भागांसाठी माहिती देणाऱ्या कृषी अॅडवायझरी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार किसान सुविधा, पुसा कृषी, एम किसान, शेतकरी मासिक अँड्राईड अॅप, फार्म-ओ-पीडिया, फसल बिमा अँड्रॉईड अॅप, अॅग्री मार्केट, इफको किसान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या कृषी ज्ञान सह अनेक अॅप्सचं मिळून एक सर्वसमावेशक अॅप भारत सरकार लाँच करणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच या अॅपच्या कार्यवाहीबाबत बैठक करुन माहिती जाणून घेतली आहे. येत्या काही आठवड्यात या अॅपचं अनावरण करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.