धक्कादायक! २६ वर्षीय शास्त्रज्ञ पुरात गेली वाहून; स्वप्न राहिलं अपूर्ण, भावुक करणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:01 PM2024-09-04T14:01:12+5:302024-09-04T14:14:15+5:30
अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता.
तिची स्वप्नं मोठी होती, तिची जिद्द मोठी होती... तिला असं काही करायचं होतं ज्यामुळे तिलाच नाही तर संपूर्ण गावाचं नाव मोठं होईल... तिने अनेक संकटांना धैर्याने तोंड दिलं आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर अगदी लहान वयातच तिने यश मिळवत मोठी झेप घेतली, पण कदाचित नियतीला हे मान्य नाही. वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे जग सोडलं. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. ही तरुणी म्हणजे पुरस्कार विजेती कृषी शास्त्रज्ञ डॉ. नुनावथ अश्विनी.
अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता. रविवारी सकाळी तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात आलेल्या पुरात अश्विनी आणि तिचे वडील एन. मोतीलाल हे वाहून गेले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत कारमधून हैदराबादला जात होते.
अश्विनीचा मोठा चुलत भाऊ एन. हरीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात प्रेमळ सदस्य गमावली आहे. ती महत्वाकांक्षी आणि हुशार होती. तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा होती. तिला तिचं करियर करायचं होतं. संपूर्ण घराला तिचा अभिमान वाटत होता.
जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये पीएचडी केलेली अश्विनी, ICAR च्या क्रॉप रेझिस्टन्स सिस्टम्स रिसर्च स्कूलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होती. एप्रिलमध्ये रायपूर येथे झालेल्या कृषी परिषदेत तिला यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला. कुटुंबीयांनी सांगितलं की, अश्विनी गेल्या आठवड्यातच तिचा भाऊ अशोक कुमारच्या साखरपुड्यासाठी घरी आली होती. तिला रविवारी रायपूरला परतायचं होतं आणि सोमवारी ड्युटीवर जायचं होतं.
रविवारी पहाटे तिचे वडील मोतीलाल यांनी मुसळधार पावसात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथील पुलावर जात असताना त्यांची कार वाहून गेली. तो पूल आधीच पाण्याखाली गेला होता, त्यांची कार जोरदार प्रवाहात वाहून गेली आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.