अगुस्ता प्रकरणात दलालांना ४३१ कोटी दिल्याचे पुरावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 06:01 AM2019-01-01T06:01:26+5:302019-01-01T06:01:53+5:30
८ मे २०११ रोजी दुबई येथे झालेल्या बैठकीत मिशेल व हास्च्के यांच्यात जो लेखी करार झाला त्यात या ५४ दशलक्ष युरोच्या रकमेचा उल्लेख आहे. दलालांच्या दोन गटांमधील वाद मिटविण्यासाठी या कराराने तडजोड करण्यात आली होती.
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये नव्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याचे निमित्त असलेल्या अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीमधील कथित गैरव्यवहारात ख्रिश्चन मिशेल आणि ग्युईडो हाच्स्के या दोन कथित दलालांना किमान ४३१ कोटी रुपये (प्रचलित विमिनय दरानुसार सुमारे ५४ दशलक्ष युरो) दिले गेल्याचे सज्जड पुरावे दाखविणारे दस्तावेज तपासात हाती लागल्याचा दावा केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) केला आहे. यातील ख्रिश्चन मायकेल दुबईतून प्रत्यार्पण झाल्यानंतर सध्या ‘ईडी’च्या कोठडीत आहे.
सूत्रांनुसार ही रक्कम कंत्राट पदरी पाडून घेण्यासाठी भारतातील संबंधितांना चुकती करण्यासाठी या दोघांकडे सुपुर्द करण्यात आली होती. या कागदपत्रांच्या अनुषंगाने पुढील तपास केल्यास ते ‘वजनदार भारतीय’ कोण हे समजणे सोपे होईल, असा तपासी अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
सूत्रांनुसार ८ मे २०११ रोजी दुबई येथे झालेल्या बैठकीत मिशेल व हास्च्के यांच्यात जो लेखी करार झाला त्यात या ५४ दशलक्ष युरोच्या रकमेचा उल्लेख आहे. दलालांच्या दोन गटांमधील वाद मिटविण्यासाठी या कराराने तडजोड करण्यात आली होती. यापैकी एक गट मिशेल आणि त्याच्या सहका-यांचा होता तर दुसरा हाच्स्के, कार्लो गेरोसा व त्यागी बंधूचा होता. या त्यागी बंधूंचा उल्लेख ‘फॅमिली’ असा करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या इटालीत झालेल्या तपासात जी कागदपत्रे समोर आली ती आता ‘सीबीआय’लाही उपलब्ध झाल्याचे कळते. ५८ दशलक्ष युरोपैकी ४२ दशलक्ष युरो एवढा मोठा हिस्सा मिशेल यास मिळावा व आपल्या वाट्याला फक्त ३० धसक्ष युरो यावेत यावरून हास्च्के नाराज होता. दुबईत झालेल्या या समझोत्यानुसार मिशेल यास ३० दशलक्ष युरो व हाच्स्के यास २८ दशलक्ष युरो अशी वाटणी करण्यावर तडजोड झाली होती.
सूत्रांनुसार या व्यवहारातील खरी लाच सल्लागार सेवा पुरविण्याच्या नावाखाली त्यावेळच्या अँग्लो-इटालियन कंपनीने ‘टीम’ला (मिशेल) व ‘फॅमिली’ला (हाच्स्के, गेरोसा व त्यागी) यांना आधीच दिली गेलेली होती. या रकमेची वाटणी कशी करायची याचा वाद सोडविण्यासाठी प्रामुक्याने दुबईतील हा समझोता झाला होता.
सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयानुसार दोन दलालांना किती रक्कम देण्याचे ठरले होते यादृष्टीने दुबईतील हा करार महत्वाचा आहे. यापैकी २२ दशलक्ष युरो ‘फॅमिली’ला व ३२ दशलक्ष युरो ‘टीम’ला दिले गेल्याची कागदपत्रेही हाती लागली आहेत. यातीलच काही रक्कम काही भारतीयांनाही दिली गेल्याचेही तपासातून उघड झाले आहे. यापैकी २४ दशलक्ष युरो दिल्लीतील एका बड्या वकिली फर्मला दिल्याचे संकेत या कागदपत्रांवरून मिळतात.
पूर्वकल्पना दिली नाही
गेल्या वर्षी सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले त्यात माजी हवाईदल प्रमुख अॅडमिरल एस. पी. त्यागी यांनी १.४९ कोटी रुपये देऊन हरियाणातील १९ एकर जमीन खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या व्यवहाराची त्यागी यांनी हवाईदलास पूर्वकल्पना दिली नव्हती जसे करणे नियमानुसार बंधनकारक होते. यासाठी त्यागी यांनी त्यांच्या चुलत भावंडांना हाताशी धरले होते व त्यांच्या कृष्णोम नावाच्या कंपनीच्या खात्यात ही रक्कम जमा केली गेली होती.