अगुस्ता खरेदी :गोव्याच्या राज्यपालांचा राजीनामा
By admin | Published: July 5, 2014 05:25 AM2014-07-05T05:25:03+5:302014-07-05T05:25:03+5:30
गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांची अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी सकाळी चौकशी केल्यानंतर त्यांनी अखेर सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला.
पणजी : गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांची अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी सकाळी चौकशी केल्यानंतर त्यांनी अखेर सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला.
वांच्छू यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना केंद्रीय गृहसचिवांनी सायंकाळी राज्यपालांना केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा पत्र राष्ट्रपतींच्या कार्यालयास फॅक्स केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपतींकडून हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयास पाठविले जाईल. गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून कोण सूत्रे हाती घेतील ते अजून स्पष्ट झालेले नाही. वांच्छू यांच्या राजीनाम्याची चर्चा काही दिवस होती, अखेर ती खरी ठरली.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६१ नुसार सीबीआयने शुक्रवारी वांच्छू यांचा साक्षीदार या नात्याने जबाब नोंदविला. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांचाही सीबीआयने साक्षीदार म्हणून काही दिवसांपूर्वी जबाब घेतला होता. त्यानंतर तीनच दिवसांत नारायणन यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. वांच्छू काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. या भेटीत त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती, असे समजते. (प्रतिनिधी)