ख्रिश्चियन मिशेलची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:36 AM2020-04-23T01:36:23+5:302020-04-23T07:07:01+5:30
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा; कोरोनामुळे सुटका करण्याची केली होती मागणी
नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात अटकेत असलेला मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेल याची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. तो सध्या तिहार जेलमध्ये बंद असून, कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये यासाठी आपल्याला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका त्याने दाखल केली होती.
न्या. संजय किशन कौल व न्या. बी. आर. गवई यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपी ख्रिश्चियन मिशेलच्या याचिकेवर सुनावणी केली. पीठाने आरोपीची याचिका फेटाळताना म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने गठित केलेल्या उच्चाधिकार समितीच्या निकषानुसार आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही.
मिशेलचे वकील अल्जो के. जोसेफ यांचे म्हणणे होते की, आरोपीचे वय व जेलमध्ये जास्त गर्दी असल्याच्या कारणाने त्याला कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याची सुटका करण्यात यावी.
मिशेलने त्याचा अंतरिम जामीन फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या ७ एप्रिलच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील कारवाईबाबत जोसेफ यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे कैद्यांची सुटका केली जात आहे; परंतु उच्चाधिकार समितीने जाहीर केलेल्या निकषानुसार, भारतातील जेलमध्ये बंद असलेल्या विदेशी कैद्यांची सुटका केली जाऊ शकत नाही.
उच्च न्यायालयाने आरोपाचा अर्ज फेटाळताना म्हटले होते की, आरोपीला जेलमध्येच एका वेगळ्या कोठडीत ठेवले आहे. त्यात इतर दोन कैदी आहेत. हे बॅरेक नसून यात अनेक कैदी ठेवलेले नाहीत. त्याच्यासोबत राहणारे दोन्ही कैदी कोरोनाने संक्रमित नाहीत. त्यामुळे ५९ वर्षीय मिशेलने आपल्या आरोग्याचा हवाला देऊन व न्यायालयात गर्दी असल्यामुळे जामीन देण्याची केलेली मागणी अयोग्य आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.
२०१८ मध्ये मिशेलचे प्रत्यार्पण
ख्रिश्चियन मिशेलला दुबईहून प्रत्यार्पित करून २२ डिसेंबर २०१८ रोजी भारतात आणले होते. मागील वर्षी ५ जानेवारी रोजी त्याला ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. याच घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात मिशेल याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील तीन मध्यस्थांपैकी एक असून, त्याची ईडी व सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर दोन मध्यस्थ गुईडो हस्चके व कार्लो गेरोसा हे आहेत.