गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी आरोग्यमंत्री व्यास यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 09:14 AM2022-11-05T09:14:30+5:302022-11-05T09:15:13+5:30

Jai Narayan Vyas Resigns : आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या सक्रियतेमुळे गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

ahead of gujarat vidhan sabha election 2022 bjp gets big setback as former health minister jai narayan vyas resigns from party | गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी आरोग्यमंत्री व्यास यांचा राजीनामा

गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी आरोग्यमंत्री व्यास यांचा राजीनामा

Next

अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिलेले जय नारायण व्यास यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, जय नारायण व्यास हे लवकरच काँग्रेस किंवा आम आदमी पक्षात सामील होतील, कारण यापूर्वी त्यांची या दोन्ही पक्षांसोबत जवळीक वाढली होती. आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या सक्रियतेमुळे गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

माजी आरोग्य मंत्री जय नारायण व्यास 2007 ते 2012 या काळात गुजरात सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, त्यांना भाजपने बराच काळ बाजूला ठेवले होते. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली आहे. एवढेच नाही तर आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजप सरकार आहे आणि यावेळीही पक्षाचे नेते विजयाचा दावा करताना दिसत आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांचे नाव प्रमुख आहे. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोढवाडिया यांना पोरबंदरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच अकोटातून ऋत्विक जोशी, रावपुरातून संजय पटेल आणि गांधीधाममधून भरत व्ही. सोलंकी यांना तिकीट देण्यात आले आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम
गुजरातमधील विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अनुक्रमे 5 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 14 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर असणार आहे.

याचबरोबर,  15 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 17 नोव्हेंबर (टप्पा पहिला) आणि 21 नोव्हेंबर (टप्पा दुसरा) ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकांसोबतच 2023 मध्ये होणाऱ्या अन्य काही राज्यांच्या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
 

Web Title: ahead of gujarat vidhan sabha election 2022 bjp gets big setback as former health minister jai narayan vyas resigns from party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.