अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन', पगार झाले दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:24 PM2023-10-11T20:24:34+5:302023-10-11T20:29:52+5:30
राम मंदिरातील पुजारी आणि सेवकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे.
अयोध्या: मागील काही दशकापासून देशाचे राजकारण ज्या वास्तूभोवती फिरत होते ती वास्तू म्हणजे उत्तर प्रदेशामधील अयोध्येतील राम मंदीर. पण, आता तिथे भव्य मंदीर होत असून नवीन वर्षात भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. राम मंदिराच्या उभारणीमुळे तेथील पुजाऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचे दिसते. खरं तर मंदिरातील पुजारी आणि सेवकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, आता मुख्य पुजाऱ्याचे वेतन ३२,९०० रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्याचा पगार ३१,९०० रुपये करण्यात आला आहे. पूर्वी मुख्य पुजाऱ्याला २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्याला २० हजार रुपये मिळत होते. तसेच इतर पुजारी आणि सेवकांच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे.
पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन'
राम मंदीर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी लवकरच पुजारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डिंग आणि वैद्यकीय सुविधांसोबतच पुजाऱ्यांना निवासी भत्ताही दिला जाणार असल्याचे समजते.
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापूर्वी येथील मुख्य पुजारी आणि सहाय्यक पुजारी यांचे पगार खूपच कमी होते. त्या काळात मुख्य पुजाऱ्यांना केवळ १५,५२० रुपये तर सहाय्यक पुजाऱ्यांना ८,९४० रुपये एवढा पगार मिळत होता. वाढती महागाई पाहता मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पगार वाढवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने मे महिन्यात पहिली वेतनवाढ दिली आणि मुख्य पुजाऱ्यांना २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्यांना २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यात मुख्य पुजाऱ्यांचा पगार २५ हजारांवरून ३२ हजार ९०० रुपये तर त्यांच्या सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार ३१,००० रुपये करण्यात आला आहे.