शशिकला यांची १,५०० कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:12 AM2020-10-09T01:12:37+5:302020-10-09T01:12:43+5:30
कारावास संपण्याच्या ३ महिने आधी कारवाई
चेन्नई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेल्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी व्ही.के. शशिकला यांचा कारावास संपण्यास अजून तीन महिने शिल्लक आहेत. त्यांची मुक्तता होण्याआधीच शशिकला यांची १,५०० कोटी रुपयांची मालमत्ता प्राप्तीकर खात्याने जप्त केली आहे.
शशिकला यांना २०१७ साली कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये जयललिता या प्रमुख आरोपी होत्या. बंगळुरू येथील परप्पना अग्रहारा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या शशिकला या ६९ वर्षे वयाच्या आहेत. त्यांची शिक्षा जानेवारी महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्यानंतर येत्या मे महिन्यात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यामुळे शशिकला यांची मुक्तता झाल्यास त्याचा तामिळनाडूच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल याचा अदमास सध्या अण्णा द्रमुक, द्रमुक व अन्य छोटे पक्ष घेत आहेत.