अहमदाबाद जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांत १८ बालकांचा मृत्यू; अर्भक मृत्यूच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:08 AM2017-10-30T03:08:59+5:302017-10-30T03:09:34+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून नऊ अर्भकांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
अहमदाबाद : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून नऊ अर्भकांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या घटनानंतर काँग्रेसने रविवारी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.
पाच अर्भकांना दूर अंतरावरून रुग्णालयात आणण्यात आले होते. जन्मत:च त्यांचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती तर इतर अर्भकांच्या जीविताला घातक अशा रोगांची बाधा झाली होती व त्यांची परिस्थिती चिंताजनक होती, असे सरकारने रविवारी निवेदनात म्हटले.
२४ तासांत मरण पावलेल्या नऊ अर्भकांपैकी पाच लुणावाडा, सुरेंद्रनगर, मनसा, विरमगाम, हिंमतनगर या दूर अंतरावरून आणण्यात आले होती व त्यांची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक होती. ज्या चार अर्भकांचा रुग्णालयात जन्म झाला ते जन्मत:च श्वासावरोधामुळे मरण पावले. रुग्णालयात गेल्या तीन
दिवसांत १८ अर्भकांचा मृत्यू झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण उप संचालक आर. के. दीक्षित या मृत्युंना कोणती कारणे जबाबदार आहेत याची चौकशी करतील. (वृत्तसंस्था)
मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी गांधीनगरमध्ये रविवारी वरिष्ठ अधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला, असे आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव जयंती रवी यांनी सांगितले. जयंती रवी म्हणाल्या की, काही अर्भकांची प्रकृती खालावलेली होती. दूर अंतरावरून त्यांना येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते कारण तेथील डॉक्टर्स दिवाळीच्या सुटीवर होते. मृत्युच्या प्रथमदर्शनी कारणांची चौकशी समिती करील व अहवाल एका दिवसात देईल अशी अपेक्षा आहे.
अत्यंत कमी वजनाची बाळे जन्मण्याचे प्रमाण कमी कसे करायचे याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. गरोदर महिलांना गरोदरपणात पुरेसा पौष्टीक आहार मिळत नाही. येथील सामान्य रुग्णालयात रोज नवजात अर्भकांच्या मृत्युचे प्रमाण सरासरी पाच ते सहा आहे, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.