प्लास्टिक बॉटल जमा करा अन् पैसे मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 01:39 PM2019-06-18T13:39:20+5:302019-06-18T13:39:42+5:30
या बॉटल्सपासून धागा अथवा तार बनविण्यात येणार आहे. तसेच याचा वापर टीशर्ट, हवा भरलेली उशी, टीव्ही, फ्रीजचे कव्हर बनविण्यासाठीही होणार आहे.
अहमदाबाद - प्लास्टिक बॉटल जमा केल्यानंतर त्याबदल्यात अहमदाबादमधील नागरिकांना लवकरच पैसे मिळणार आहे. सॉलिड वेस्ट मॅनजमेंट या प्रकल्पासाठी अहमदाबाद महानगरपालिका शहरातील 5 जागांवर रिवर्स वेडिंग मशीन लावणार आहे. जेथे शहरातील नागरिक प्लास्टिक बॉटल जमा करु शकतील.
सूत्रांच्या माहितीनुसार बॉटलच्या आकाराप्रमाणे नागरिकांना प्रति बॉटल एक रुपया देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे संचालक हर्षद सोलंकी यांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये दिवसाला 3, 200 मेट्रीक टन कचरा जमा होता. यामध्ये 110 मेट्रीक टन कचरा प्लास्टिक बॉटलचा असतो. या वेडिंग मशीन चालविण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सगळ्या बॉटल एकत्र करुन त्याचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. या बॉटल्सपासून धागा अथवा तार बनविण्यात येणार आहे. तसेच याचा वापर टीशर्ट, हवा भरलेली उशी, टीव्ही, फ्रीजचे कव्हर बनविण्यासाठीही होणार आहे.
महानगरपालिका आणि गुजरात पर्यावरण नियंत्रण बोर्ड यांच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर गुजरातच्या प्रत्येक शहरात या वेडिंग मशीन बसविण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
सध्या या मशीन अहमदाबादमधील चित्रा पब्लिक पार्क, प्रेमचंदनगर, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, ओएनजीसी मोटेरा कॉम्प्लेक्स, गांधीनगर, भटगाम याठिकाणी लावण्यात येतील. या मशीनची जबाबदारी तीन वर्षासाठी कंत्राटदारांवर सोपविण्यात येणार आहे. कंत्राटदारांना भाड्याने जमीन देऊन मशीन लावण्यासाठी 101 रुपये भाडे आकारण्यात येईल. कंत्राटदारांना लोकांकडून बॉटल घेतली त्याबदल्यात त्यांना पैसे देतील. यानंतर जमा झालेल्या बॉटल्स पुर्नवापर करणाऱ्यांकडे जाऊन विकतील.