अहमदाबादचे कॉल सेंटर बंद!
By admin | Published: October 10, 2016 05:32 AM2016-10-10T05:32:18+5:302016-10-10T05:32:18+5:30
ठाणे जिल्हयातील मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून ७० जणांना अटक केल्याचे वृत्त देशभर पसरताच अहमदाबाद येथील प्रल्हादनगरमधील पिनॅकल बिझनेस
ठाणे : ठाणे जिल्हयातील मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून ७० जणांना अटक केल्याचे वृत्त देशभर पसरताच अहमदाबाद येथील प्रल्हादनगरमधील पिनॅकल बिझनेस सेंटर हे कॉल सेंटरही तडकाफडकी बंद करण्यात आले आहे. हे कॉल सेंटर बंद झाल्यामुळे येथील ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याद्वारे कोणाला फसविले, याचाही तपास आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी गुजरात पोलिसांच्या मदतीने करीत आहेत.
अहमदाबाद शहरातील प्रल्हादनगरमधील या पिनॅकल बिझनेस सेंटरमध्ये चार कॉल सेंटर अशाच प्रकारे सुरू होती. तिथूनही अमेरिकेत धमक्या देणारे, फसवणुकीचे तसेच खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. याबाबतची खातरजमा झाल्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी पोलीस उपायुक्त पराग मणेरे, युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक एन. टी. कदम, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे निरीक्षक रवींद्र दौंडकर, उपनिरीक्षक विजय उपाळे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी शनिवारी धाडसत्र राबविले. मात्र, चार पैकी एकाही कॉल सेंटरवर कर्मचारी सोडा कोणतीही साधनसामुग्री उपलब्ध पोलिसांना मिळाली नाही. ५ आॅक्टोबरला ठाण्यात धाड टाकल्याचे समजल्यानंतर ६ आॅक्टोबरला एकाच दिवसात कॉल सेंटर रिक्त करण्यात आले. त्याचदिवशी कॉल सेंटरच्या भाड्यापोटीची रक्कमही संबंधितांना अदा करण्यात आली. अहमदाबाद पाठोपाठ दिल्ली, चंदीगड, कलकत्ता येथील कॉल सेंटर बंद झाली. देशभरात कोणत्याही ठिकाणी त्याबाबतची माहिती मिळाल्यास तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)