यूपीएससी परीक्षेवर ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच; ‘नीट’सारखा गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:45 AM2024-06-25T05:45:39+5:302024-06-25T05:46:35+5:30

नीट-यूजी, नेट आदी महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे उजेडात आल्याने गदारोळ माजला आहे.

AI cameras watch over UPSC exam Measures to avoid confusion like neet | यूपीएससी परीक्षेवर ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच; ‘नीट’सारखा गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना

यूपीएससी परीक्षेवर ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच; ‘नीट’सारखा गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट-यूजी, नेट आदी महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे उजेडात आल्याने गदारोळ माजला आहे. असा गोंधळ यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून त्या संस्थेने तातडीने काही पावले उचलली आहेत. त्या परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षार्थींची ओळख पटविण्याकरिता फेशियल रेकग्निशन तंत्र तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित होणारे सीसीटीव्ही यांचा वापर करण्याचे यूपीएससीने ठरविले आहे. 

आधारवर आधारित फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन व फेशियल रेकग्निशन तसेच प्रवेशपत्रांचे क्यू-आर कोड स्कॅनिंग या कामासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून उपकरणे मागविण्यासाठी यूपीएससीने नुकतीच निविदा सूचना जाहीर केली आहे. यूपीएससी भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यांच्यासह १४ महत्त्वाच्या परीक्षा घेते.

दर २४ परीक्षार्थींमागे एक सीसीटीव्ही
यूपीएससीने म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या केंद्रातील प्रत्येक वर्गामध्ये पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. दर २४ परीक्षार्थींमागे एक सीसीटीव्ही असे हे प्रमाण असेल.
तसेच परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार तसेच तिथून बाहेर जाण्याचा मार्ग, नियंत्रण कक्ष या ठिकाणीही सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गात एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रावर कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्याबद्दल त्वरित इशारा देणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्हिडीओ यंत्रणा परीक्षा केंद्रांत बसविण्याचा यूपीएससीचा विचार आहे.

यंदा २६ लाख उमेदवार बसणार परीक्षेला
- यूपीएससीतर्फे होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी यंदा २६ लाख परीक्षार्थी असण्याची शक्यता आहे. त्यासाठी लेह,  कारगिल, श्रीनगर, इम्फाळ, आगरतळा, गंगटोक आदींसह ८० ठिकाणी परीक्षा केंद्रे असण्याची शक्यता आहे. 
- स्पर्धा परीक्षा मुक्त तसेच निष्पक्षपाती वातावरणात पार पडाव्यात यासाठी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे यूपीएससीने म्हटले आहे. 

Web Title: AI cameras watch over UPSC exam Measures to avoid confusion like neet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.