गोविंदा, गोविंदा! तामिळनाडूतील भक्ताने मंदिर निर्माणासाठी दान केली २० कोटींची जमीन
By देवेश फडके | Published: February 7, 2021 01:22 PM2021-02-07T13:22:56+5:302021-02-07T13:25:11+5:30
एका भाविकाने तिरुमाला तिरुपती देवस्थानला चार एकर जमीन आणि ३.१६ कोटी रुपयांचे दान केले आहे. तामिळनाडूत वेंकटेश्वर मंदिर बांधण्यासाठी या भाविकाने दान दिल्याची माहिती मिळाली आहे.
तिरुपती : देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान म्हणून तामिळनाडूतील तिरुमाला तिरुपती मंदिर आघाडीवर आहे. हजारो भाविक दररोज तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात. एका भाविकाने तिरुमाला तिरुपती देवस्थानला चार एकर जमीन आणि ३.१६ कोटी रुपयांचे दान केले आहे. तामिळनाडूत वेंकटेश्वर मंदिर बांधण्यासाठी या भाविकाने दान दिल्याची माहिती मिळाली आहे. या भाविकाने दान केलेल्या जमिनीची किंमत २० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते. (Devotee Donates Land Worth Rupees 20 Crore to Tirupati Devasthanam)
तिरुपती मंदिराला दान देणाऱ्या भाविकाचे नाव आर कुमारगुरू आहे. कुमारगुरू हे टीटीडी विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत. तामिळनाडूतील कल्लाकुरुचि जिल्ह्यातील उलांदुरुपेटा येथे मंदिर बांधण्यासाठी कुमारगुरू यांनी जमीन आणि रक्कम दान दिल्याचे समजते. एवढेच नव्हे, तर कुमारगुरू उलांदरुपेटा येथून एआयडीएमके पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कुमारगुरू यांनी धनादेश आणि जमिनीच्या हस्तांतरणाचे कागदपत्र टीटीडी चेअरमन व्हाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या निर्देशावरून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदू सनातन धर्माचा प्रचार सुरू करण्याचे काम टीटीडीने सुरू केले आहे, अशी माहिती टीटीडी बोर्डाकडून देण्यात आली.
ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर मात करण्यास भारतातील कोव्हिशील्ड प्रभावी ठरतेय
कुमारगुरू यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना भगवान वेंगटेश्वरचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सोयी, सुविधा देण्यासाठी ३.१६ कोटी रुपये आणि चार एकर जमीन दान स्वरुपात दिली आहे. यापूर्वीही कुमारगुरू यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला होता, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
एखादा चांगला मुहूर्त पाहून तामिळनाडूत मंदिराचे भूमिपूजन केले जाईल. तसेच यापुढेही मंदिर बांधकामासाठी दान, देणग्या जमा करण्याचे काम सुरू राहील, असे कुमारगुरू यांनी सांगितले.