अभिनयापासून सत्तेपर्यंतचा प्रवास करणारा अण्णाद्रमुक पक्ष
By admin | Published: May 19, 2016 04:09 PM2016-05-19T16:09:45+5:302016-05-19T16:14:44+5:30
तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्र यांच्या निधनानंतर सलग दुस-यांदा सत्ता मिळवणा-या जयललिता तामिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १९ - तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्र यांच्या निधनानंतर सलग दुस-यांदा सत्ता मिळवणा-या जयललिता तामिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. रामचंद्र जयललिता यांचे राजकीय गुरु होते. त्यांच्या निधनानंतर १९९१ पासून तामिळनाडूमध्ये एम करुणानिधी यांच्या द्रमुक आणि जयललिता यांच्या अण्णाद्रमुक या दोन पक्षांच्याच हाती आलटून-पालटून सत्ता राहिली आहे.
एम.जी.रामचंद्र मेनन यांनी १९७२ मध्ये अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. तामिळ अभिनेते म्हणून असलेल्या लोकप्रियतेच्या आधारावर त्यांनी पक्षाचा विस्तार केला. १९७७ साली एम.जी.रामचंद्र पहिल्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सलग तीन टर्म त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे १९८७ पर्यंत ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर कायम होते.
जयललिता यांच्या आयुष्यावर रामचंद्र यांचा प्रचंड प्रभाव होता. जयललिता यांच्या राजकीय प्रवेशावरुन नेहमीच वाद राहिला आहे. रामचंद्र यांनी जयललितांना राजकारणात आणले म्हणून बोलले जाते. पण जयललितांना हे मान्य नाही. आपण स्वत:हून राजकारणाची वाट निवडली असे त्या सांगतात.