सिद्धू यांच्यासाठी ‘आप’ हाच एकमेव पर्याय...
By admin | Published: July 20, 2016 05:31 AM2016-07-20T05:31:48+5:302016-07-20T05:31:48+5:30
राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्यासोबत नवज्योत सिद्धू यांनी भाजपशी काडीमोड घेतला
चंदीगड : राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्यासोबत नवज्योत सिद्धू यांनी भाजपशी काडीमोड घेतला असून आता त्यांच्यासाठी ‘आम आदमी पार्टी’त सामील होणे, हाच एकमेव पर्याय आहे. ते पुन्हा भाजपत पतरण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी स्पष्ट केले.
सोमवारी नवज्योत सिद्धू यांनी राज्यसभेचा राजीनामा देत भाजपला सणकावून षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धू यांची पुढची राजकीय दिशा आणि भूमिका काय असेल, याबाबत बोलताना नवज्योत कौर म्हणाल्या की, ते भविष्यतील आपली योजना येत्या काही दिवसांत स्पष्ट करतील. पंजाबची सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. आम आदमी पार्टीतून पंजाबची सेवा करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यांनी आजवर कधीही माघार घेतलेली नाही, असेही त्या म्हणाल्या. नवज्योत कौर अमृतरसर-पूर्व मतदारसंघाच्या आमदार आणि शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारमध्ये मुख्य संसदीय सचिव आहेत.
मोदी सरकारने त्यांना राज्यसभेचे सदस्य केल्यानंतर तिसऱ्याच महिन्यात नवज्योत सिद्धू यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. तसेच पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आपचा चेहरा म्हणून मैदानात उतरविण्याचे संकेत आम आदमी पार्टीने दिले आहेत.
>मी भाजपा आमदार आहे...
नवज्योत कौर म्हणाल्या की, मी भाजप आमदार आणि पक्षाची मुख्य संसदीय सचिव म्हणून काम करीत आहे. भविष्यातील भूमिका अद्याप ठरवलेली नाही. सिद्धू यांचा मात्र पर्याय स्पष्ट झालेला आहे. त्यांना पंजाबची सेवा करायची आहे. मी नेहमीच त्यांच्या बाजूने असते. आपल्या सरकारविरुद्ध विविध मुद्यांवर आवाज उठविणाऱ्या नवज्योत कौर म्हणाल्या की, सिद्धू यांच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळही गेली आहे.