उडत्या विमानात 2 वर्षीय चिमुकलीची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, एम्सचे 5 डॉक्टर बनले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:32 PM2023-08-28T14:32:33+5:302023-08-28T14:33:17+5:30
बंगळुरुवरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानात अचानक मुलीची तब्येत बिघडली, यानंतर एम्सचे डॉक्टर देवदूत बनले.
AIIMS News: रुग्णांवर उपचार करुन, त्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणाऱ्या डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते. तुम्ही डॉक्टरांना रुग्णालयात सर्जरी करताना अनेकदा पाहिले असेल, पण आता डॉक्टरांनी चक्क विमानात सर्जरी केल्याची घटना घडली आहे. बंगळुरुहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये रविवारी सायंकाळी एक चमत्कार घडला. एका 2 वर्षीय मुलीची प्रकृती खालावली, त्यामुळे त्याच फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या 5 डॉक्टरांनी तिच्यावर उडत्या विमानात उपचार केले. एम्सच्या डॉक्टरांनी केलेल्या या चमत्कारामुळे त्या 2 वर्षीय मुलीचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुहून विस्ताराचे UK-814 विमान रविवारी संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना झाले. यावेळी सायनोटिक आजाराने ग्रस्त असलेली 2 वर्षांची मुलगी बेशुद्ध पडली होती. मुलीचे ठोके बंद झाले अन् हात-पायदेखील थंड पडले. यानंतर उडत्या विमानात इमर्जन्सी कॉल जाहीर करण्यात आला. सुदैवाने त्यावेळेस त्याच विमानात एम्सचे डॉक्टर उपस्थित होते.
#Always available #AIIMSParivar
— AIIMS, New Delhi (@aiims_newdelhi) August 27, 2023
While returning from ISVIR- on board Bangalore to Delhi flight today evening, in Vistara Airline flight UK-814- A distress call was announced
It was a 2 year old cyanotic female child who was operated outside for intracardiac repair , was… pic.twitter.com/crDwb1MsFM
उडत्या विमानात मुलीवर उपचार
डॉक्टरांनी मुलीला सीपीआर सुरू केला आणि त्यांच्याकडे जे काही साधन आहे, ते वापरुन मुलीवर उपचार केले. उपचारादरम्यान मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने अडचण आणखी वाढली. पण, नंतर एईडीचा वापर करण्यात आला. डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे मुलीवर उपचार केले. यादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व साधनांचा वापर करून मुलीचे प्राण वाचले. 45 मिनिटे उपचार केल्यानंतर मुलीला विमानाने नागपूरला रवाना करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
पाच डॉक्टर बनले देवदूत
एम्सच्या ज्या पाच डॉक्टरांनी हा चमत्कार घडवला, त्यात अॅनेस्थेसिया विभागाच्या डॉ. नवदीप कौर, एसआर कार्डिएक रेडिओलॉजी डॉ. दमनदीप सिंह, माजी एसआर एम्स रेडिओलॉजी डॉ. ऋषभ जैन, माजी एसआर एम्स एसआर ओबीजी डॉ. ओइशिका आणि एसआर कार्डिएक रेडिओलॉजी डॉ. अविचला टॅक्सक यांचा समावेश आहे.
मुलीला नेमका कोणता आजार?
2 वर्षाची चिमुकली सायनोटिक आजाराने ग्रस्त आहे. हा एक जन्मजात आजार आहे, ज्यामध्ये हृदयाच्या धमन्यांमध्ये आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते. यामुळे त्वचा निळी पडते, अचानक श्वास घेण्यास त्रास होतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. या समस्येला जन्मजात हृदयरोग असेही म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये बाळाच्या जन्मानंतर लवकर हा आजार समजत नाही. त्यामुळे गरोदरपणातच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.