Coronavirus: ...तर मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 07:56 AM2020-04-07T07:56:31+5:302020-04-07T08:37:18+5:30
कोरोनाची लागण कुठून झाली याची कुणतेही माहिती नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे.
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ४९० वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
भारतात काही ठिकाणी कोरोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचे गुलेरिया यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रणदीप गुलेरिया म्हणाले की, संपूर्ण देशाचा विचार केला, तर सध्या भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्यभागी आहे. कोरोनाची लागण कुठून झाली याची कुणतेही माहिती नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. हे तिसऱ्या टप्प्याचं लक्षण आहे. मुंबईचा काही भाग आणि देशातले कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कम्युनिटी स्प्रेड इतक्या झपाट्याने होतो आहे अश्या ठिकाणी कोरोनाने आधीच तिसरा टप्पा गाठल्याचे रणदीप गुलेरीया यांनी सांगितले. तसेच मुंबईच्या ज्या भागात कोरोनाने तिसरा टप्पा गाठला आहे त्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली नाही तर कोरोना झपाट्याने पसरेल आणि मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल असा इशारा रणदीप गुलेरीया यांनी यावेळी दिला.
दरम्यान, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७५६३ नमुन्यांपैकी १५,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ६६ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३२,५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीममधील आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इअतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ७१ तर बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.