योगींना आव्हान दिल्यानंतर ओवेसींचा यू-टर्न; म्हणाले, 'विधान वैयक्तिक नसून राजकीय विरोधात'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:28 AM2021-07-09T10:28:43+5:302021-07-09T10:36:03+5:30
asaduddin owaisi : गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना आव्हान दिले होते.
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकासाठी (UP Assembly Election) राजकीय पक्षांची जोरात सुरू आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत असलेली भाजपा 'मिशन २०२२' साठी सतत मंथन करीत आहे, तर समाजवादी पक्षही विजयाच्या रणनीतीअंतर्गत युती करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचबरोबर, बसपा सुप्रिमो मायावती यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना आव्हान दिले होते. आता असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या विधानवरून यू-टर्न घेतला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी एका हिंदी न्यूज वाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'योगी आदित्यनाथ यांना वैयक्तिकरित्या आव्हान देण्याचे विधान नाही, परंतु राजकीय विरोधातील आहे, जर आम्ही विरोधात आहे, तर आम्ही सरकार स्थापन करू देणार नाही.'
याचबरोबर, 'आम्ही युतीसंदर्भात भागीदारी आघाडीत आहोत आणि ओमप्रकाश राजभर सर्व पक्षांना आपल्यासोबत सामील करत आहेत, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. याशिवाय, समाजवादी पक्षासह विरोधकांच्या आरोपावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, 'आम्ही एकत्र लढा देऊ, तुम्हाला असे वाटते की आम्ही भाजपाची बी टीम आहोत, तुम्ही सर्वजण एका चष्मातून पाहाताय, हे इतर पक्षांना का लागू होत नाही?' दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. "असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेष समाजाचे समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपाला आव्हान देऊ शकत नाही. भाजपा आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकार करतो," असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल - योगी आदित्यनाथ
पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. त्यातच, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 403 पैकी 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने 75 पैकी 67 जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना, योगींनी हा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे.