Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसींचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “‘या’ एका गोष्टीचं क्रेडिट द्यायलाच हवं”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:50 PM2022-12-10T18:50:25+5:302022-12-10T18:51:18+5:30
Asaduddin Owaisi: काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला भाजपला रोखणे शक्य होत नाही, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
Asaduddin Owaisi: काहीच दिवसांपूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व यशाला गवसणी घातली. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला पराभवाची चव चाखायला लावली. यानंतर विरोधकांनी हिमाचलमध्ये झालेल्या पराभवाबाबत भाजपवर टीका केली. यातच एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत, एका गोष्टीचे क्रेडिट त्यांना द्यायलाच हवे, असे म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ओवेसी म्हणाले की, जे मुस्लिम काँग्रेसवर प्रेम करत आहेत, ते चुकीचे करत आहेत. तिथून काहीतरी मिळेल असे त्यांना वाटते. पण त्यांना काहीच मिळणार नाही. ते भाजपचा पराभव करू शकतात, हे मुस्लिमांच्या मनावर बिंबवले गेले आहे. भाजपला हिंदू मते अधिक प्रमाणात मिळत असल्याने विजयी होत आहे. मात्र, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला भाजपला रोखणे शक्य होत नाहीये, अशी टीका ओवेसी यांनी केली.
‘या’ एका गोष्टीचे क्रेडिट द्यायलाच हवे
नरेंद्र मोदींनी भारतातील बहुसंख्य लोकांची दुखरी नस ओळखली आहे, याचे क्रेडिट त्यांना द्यावे लागेल. मुस्लिम बांधवांना आपण यांना पराभूत करू शकतो, याचे केवळ स्वप्न दाखवले जाते. परंतु, मोरबीत १४० लोकांचा मृत्यू झाला. तेथे भाजप जिंकला. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्याला संस्कारी म्हणणारा जिंकला, ही गोष्ट समजून घ्यायला हवी, असे सांगत आज नाही तर उद्या ही गोष्ट नक्कीच समजेल, असा विश्वास ओवेसी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. गुजरातमध्ये काँग्रेस नेमके काय करत होती, अशी विचारणा करत,तुमचा नेता पायी भारतभर फिरत आहे. मात्र, याचीही जबाबदारी आम्हीच घ्याची का? तो बाबा म्हणून फिरत आहे. कुणीतरी म्हटले होते की, त्यांना हिमाचल म्हणू नका, नाहीतर तिथेही हरले असते, असा टोला ओवेसी यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"