"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 01:18 PM2021-05-29T13:18:04+5:302021-05-29T13:24:29+5:30
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Asaduddin Owaisi)
नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अशात लसीकरणाला (Vaccination) महामारीवरील परिणामकारक शस्त्र मानले जात आहे. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. मात्र, लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे, असेही ओवैसी म्हणाले.
Coronavirus: साथीला रोखण्यासाठी मोदी सरकारकडे रणनीतीच नाही, राहुल गांधी यांचा घणाघात
एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "खोटं, खोटं आणि खोटं. मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे. पंतप्रधान ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा. आपल्या महालातून बाहेर येऊन पाहा, देशातील गरीबांची काय परिस्थिती आहे."
ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल -
भारतात कोरोनाविरोधात लसीकरण अभियान सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत करोरोना लसीचे 20,89,02,445 (20 कोटींहून अधिक) लशी दिल्या गेल्या आहेत. तर गेल्या 24 तासांत 30,62,747 डोसे देण्यात आले आहेत.
"...पण मोदी सरकारला काळजीच नाही!" राहुल गांधींनी सांगितली कोरोनाला कंट्रोलमध्ये आणायची 'की'
लशीसंदर्भात राहुल गांधींचाही मोदींवर निशाणा -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरत, राहुल गांधी म्हणाले. कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही. तिचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोना लस देण्यात आपण जितका उशीर करू तितके या विषाणूची नवनवीन उत्परिवर्तने व प्रकार अस्तित्वात येऊन माणसांवर हल्ला करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही भीती आहे. कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत असतो. राहुल गांधी यांनी सांगितले की, कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो, पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
तसेच, जगातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लशी तयार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लशी भारतात शक्य तितक्या लवकर आणाव्यात, असेही राहुल म्हणाले.