Asaduddin Owaisi : सात कोटींचे कर्ज अन् दोन बंदुका... असदुद्दीन ओवेसींची संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:26 AM2024-04-20T11:26:27+5:302024-04-20T11:27:47+5:30
Lok Sabha Elections 2024 : हैदराबाद हा एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो.
Asaduddin Owaisi Property : लोकसभा निवडणुकीत सध्या हैदराबादची जागा चर्चेत आहे. कारण, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे या जागेवरून चार वेळा खासदार झाले आहेत. परंतु यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा उमेदवार माधवी लता तगडी टक्कर देत असल्याचे दिसत आहे. हैदराबाद हा एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो.
अशा परिस्थितीत असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे किती संपत्ती आहे? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? याबाबत जाणून घेण्याची लोकांना जास्त उत्सुकता आहे.हैदराबादचे चार वेळा खासदार राहिलेले आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लंडनच्या लिंकन्स इनमधून बार ॲट लॉमध्ये एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. तसेच, लोकसभेचे खासदार म्हणून मिळणारी सॅलरी हा त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यांची पत्नी गृहिणी आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे 2.80 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता (रोख, सोने, विमा इ.) आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 15.71 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्याकडे 16.01 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (जमीन-व्यावसायिक आणि शेती) असून त्यात त्यांच्या पत्नीची 4.90 कोटी रुपयांची भागीदारी आहे. याशिवाय, हैदराबादच्या खासदाराच्या नावावर मिश्रीगंजमध्ये आणखी एक निवासी मालमत्ता आहे. असदुद्दीन ओवेसी यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत.
याचबरोबर, असदुद्दीन ओवेसी यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सात कोटी रुपयांचे कर्ज आहे. ज्यामध्ये घरबांधणीसाठी 3.85 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच, असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे दोन बंदुकाही आहेत, ज्यात एनपी बोर 22 ची पिस्तूल आणि एनपी बोअरची 30-60 ची रायफल आहे. यासोबतच असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात 5 खटले प्रलंबित आहेत. त्यांच्यावर दाखल झालेले खटले उत्तर प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि महाराष्ट्रातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत.