ओवेसींकडून शहांची तुलना थेट हिटलरशी; नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन रणकंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:59 PM2019-12-09T15:59:44+5:302019-12-09T16:18:54+5:30
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत; मोदी सरकारला शिवसेनेची साथ
नवी दिल्ली: गेल्या साठ वर्षांपासून रखडलेलं नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत मांडण्यासाठी मतदान पार पडलं. या ठरावाच्या बाजूने २९३ जणांनी मतदान केलं तर ठरावाच्या विरोधात ८२ मतं पडली. यावेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन मोदी सरकारवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या रडारवर होते. ओवेसींनी शहांची तुलना थेट हुकूमशहा हिटलरशी केली.
लोकसभा अध्यक्षांनी देशाला अशा कायद्यापासून वाचवावं, असं आवाहन ओवेसींनी केलं. 'देशाला आणि गृहमंत्र्यांना लोकसभा अध्यक्षांनी वाचवावं. अन्यथा नुरेमबर्ग कायदा आणि इस्रायलच्या नागरिकत्व कायद्यावेळी जो प्रकार घडला, तोच भविष्यात घडेल आणि हिटलर आणि बेन गुरियन यांच्याप्रमाणेच गृहमंत्र्यांचं नाव इतिहासात नोंदलं जाईल,' अशा शब्दांत ओवेसींनी शहांवर सडकून टीका केली.
इस्रायलमध्ये संरक्षण मंत्र्यांचं नाव हिटलरशी जोडलं जातं, असं म्हणत ओवेसींनी डेव्हिड बेन-गुरियन यांचा संदर्भ दिला. बेन गुरियन इस्रायलचे पहिले पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री होते. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन ओवेसींनी मोदी सरकारवर आधीपासूनच कडाडून टीका केली आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक संमत झाल्यास भारताचा इस्रायल होईल आणि नागरिकांमध्ये धर्माच्या नावावरुन भेदभाव केला जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.