Triple Talaq: मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्याचा घाट; ओवैसींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 08:29 PM2018-12-27T20:29:55+5:302018-12-27T20:32:30+5:30
'सबरीमालावेळी प्रथा परंपरा आठवल्या, मग आता का आठवत नाहीत', असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला
नवी दिल्ली: तिहेरी तलाक कायदा फक्त आणि फक्त मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख आणि खासदार यांनी केला. आज लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. यानंतर ओवैसींनी सरकारवर घणाघाती टीका केली. मुस्लिम पुरुषांना तुरुंगात टाकण्यासाठी, मुस्लिम महिलांना कमजोर करण्यासाठी तिहेरी तलाक कायदा आणण्याचा घाट सरकारनं घातल्याचा दावादेखील त्यांनी केला. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती ओवैसींनी व्यक्त केली.
AIMIM President Asaduddin Owaisi on #TripleTalaq Bill passed in LS: Yeh kanoon sirf aur sirf Muslim mahilaon ko road par lane ka hai, unko barbaad aur kamzor karna hai or jo Muslim mard hain unko jail mein daalne ka hai. Yahi is Kanoon ka ghalat istemal hoga, aap dekhna. pic.twitter.com/bOoue1KMCX
— ANI (@ANI) December 27, 2018
लोकसभेत आज तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर आज वादळी चर्चा झाली. भाजपा खासदार आणि मंत्र्यांनी या विधेयकाबद्दलची सरकारची बाजू मांडली. तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. या विधेयकावर एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार यांनी आपलं मत स्पष्ट करताना आस्था आणि श्रद्धेचा मुद्दा उपस्थित केला. सबरीमाला प्रकरण चर्चेत होतं. सर्वोच्च न्यायालयानं त्या प्रकरणात निकाल सुनावला. त्यावेळी आस्थेचा, प्रथा-परंपरेचा मुद्दा चर्चेत आला. मग आता तिहेरी तलाक आमच्या आस्थेचा, परंपरेचा विषय नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एक पुरुष कितीही महिलांशी संबंध ठेवू शकतो. त्यात कोणताही गुन्हा नाही. पण तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मी या विधेयकाला विरोध करतो, असं ओवैसी म्हणाले. सबरीमालामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. त्यावेळी अनेकांनी आस्था, प्रथा, परंपरांचा मुद्दा उपस्थित करत महिलांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. तुमची ती आस्था असते. मग आमची आस्था नसते का? ती का मान्य केली जात नाही?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. व्यभिचाराबद्दलचा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यभिचार गुन्हा नाही. मात्र तिहेरी तलाकला गुन्ह्यांचं स्वरुप देण्याचा प्रयत्न होत आहे. या कायद्याचा प्रचंड प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.