असदुद्दीन ओवैसी तुरुंगातील मुस्लिमांच्या संख्येवर म्हणतात, हा तर अन्यायाचा आणखी एक पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:50 AM2020-08-31T10:50:58+5:302020-08-31T10:51:07+5:30
अन्याय होण्याचा हा आणखी एक पुरावा आहे, ज्याचा आपण सामना करीत आहोत, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तुरुंगवासातील मुस्लिमांच्या संख्येशी संबंधित एक बातमी ट्विट केली आहे. ओवैसी लिहितात, 'मुस्लिम पुरुषांना आधीपासूनच मोठ्या संख्येने कैदेत ठेवले होते, पण आता त्यांची संख्या वाढली आहे. हे लोक कायद्याच्या दृष्टीने निर्दोष आहेत, परंतु तरीही त्यांना बरीच वर्षे तुरुंगवास भोगावा लागत आहे. अन्याय होण्याचा हा आणखी एक पुरावा आहे, ज्याचा आपण सामना करीत आहोत, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
असदुद्दीन ओवैसी यांनी इंडियन एक्स्प्रेसची एक बातमी शेअर केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) देशाच्या तुरुंगातील कैद्यांशी संबंधित आकडेवारी जाहीर केली होती. तुरुंगात कैद केलेले मुस्लिम, दलित आणि आदिवासींची संख्या देशातील लोकसंख्येच्या प्रमाणांपेक्षा वेगळी आहे, तर इतर मागासवर्गीय (OBC) आणि उच्च जातीतील लोकांच्या बाबतीत असे नाही, असे आकडेवारीवरून दिसून येतेय.
इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, सन 2019च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मुस्लिम समाजातील कैदी तुरुंगवासाची शिक्षा बऱ्याच काळापासून भोगत आहेत. 2019च्या अखेरीस देशभरातील तुरुंगात कैद झालेल्या दोषींपैकी 21.7 टक्के दलित आहेत. तसेच अनुसूचित जातीमधून येणा-यांची संख्या 21 टक्के आहे. 14.2 टक्के लोकसंख्या असलेल्या दोषी मुस्लिमांची टक्केवारी 16.6 टक्के आहे, परंतु यापैकी 18.7 टक्के कैदी खटल्याच्या अधीन आहेत.