"आधी लग्न होईल, नंतर पाहू मुलगा होणार की मुलगी"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 02:43 PM2019-11-12T14:43:54+5:302019-11-12T14:47:46+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला समर्थन देणार का? असा सवाल
मुंबई : सत्तास्थापनेसाठी भाजपाने नकार दिल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत दुसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या वेळेत शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. आघाडीच्या पाठिंब्याची पत्रे देण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ शिवसेनेने मागितली, पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे पेचप्रसंग तयार झाला असून, राष्ट्रपती राजवट अटळ असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरून महायुती आणि महाआघाडीवर निशाणा साधला आहे. नेहमी आमच्या पक्षावर आरोप करण्यात आला की, आम्ही मतं कापण्यासाठी निवडणुका लढतो. मात्र, आता सर्वांना दिसत आहे की, कोण मतं कापत आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आम्ही भाजपा किंवा शिवसेना नेतृत्वाखालील सरकारचे समर्थन करणार नाही. आम्ही आमच्या भूमिकेची पुनरावृत्ती करत आहोत. मी आता खूप खुश आहे, जर काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला समर्थन देत असेल तर लोकांना कळेल की, कोण कुणाची मतं कापत होते आणि कोण कुणाला टक्कर देत होते. तसेच, कोण कुणासोबत आहेत.
Asaduddin Owaisi,AIMIM on being asked,"if there is a scenario of NCP Chief Minister (in Maharashtra) then what will be your party's stand": Pehle nikaah hoga, uske baad sochenge ki beta hoga ya beti hogi. Abhi toh nikaah hi nahi hua. Nothing to consider. Yeh sab khel ho raha hai. https://t.co/CEzPzriyOR
— ANI (@ANI) November 12, 2019
याचबरोबर, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला समर्थन देणार का? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांना केल्यानंतर ते म्हणाले,"आधी लग्न तरी होऊ द्या. नंतर पाहू मुलगा होणार की मुलगी."
राज्यपालांचे राष्ट्रवादीला पत्र
शिवसेनेला मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून घेतले. तिसरा मोठा पक्ष म्हणून तुम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहात का आणि तितके संख्याबळ आहे का, असे विचारणा करणारे पत्र राज्यपालांनी दिले. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही २४ तासांचा अवधी दिला आहे. त्यावर काय करायचे, याचा निर्णय आम्ही चर्चेने ठरवू, असे नवाब मलिक म्हणाले.
...आणि शिवसेना ताटकळली
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे अन्य नेत्यांसह राजभवनवर पोहोचले, तेव्हा त्यांच्याजवळ शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र नव्हते. ही पत्रे येतील (फॅक्स वा मेलने) याची प्रतीक्षा करीत शिवसेनेचे नेते राजभवनावर पाऊण तास ताटकळले, पण अखेरपर्यंत पत्रेच आली नाहीत. राज्यपालांशी भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, "आमचा सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांनी अमान्य केला नाही, पण त्यासाठी दोन दिवसांची मागितलेली मुदत देण्यास असमर्थता दर्शविली. भविष्यात मित्रपक्षांकडून पाठिंब्याच्या पत्राची प्रत आम्ही राज्यपालांना सादर करू."
वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?
राज्यपालांनी आधी भाजपाला संधी दिली, पण त्यांनी असमर्थता व्यक्त केली. शिवसेनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र देऊ शकली नाही. आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले आहे. राष्ट्रवादी व नंतर काँग्रेसने असमर्थता व्यक्त केली, तर गुरुवारनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.