गुजरातमध्ये एमआयएमला मोठं यश, नगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष बनला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 03:25 PM2021-03-02T15:25:18+5:302021-03-02T15:48:22+5:30
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला असताना आप आणि एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे. भाजपनं अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील सत्ता कायम राखली आहे.
सुरत - गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये (Gujarat Municipal Election Results 2021) भारतीय जनता पक्षानं (BJP) शानदार विजय मिळवला. भाजपनं सहापैकी सहा महापालिका आपल्याकडे कायम राखल्या आहेत. एकूण ५७५ पैकी ४८३ जागा जिंकत भाजपनं महापालिका निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिला. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानं निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. मात्र काँग्रेसची (Congress) कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. आता, नगरपालिका आणि पंचायत समितींच्या निवडणुकांतही भाजपाला भरगोस यश मिळालंय. तर, असुदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमनेही एका नगरपालिकेत चांगलीच भरारी घेतलीय.
गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला असताना आप आणि एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे. भाजपनं अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील सत्ता कायम राखली आहे. सहा महापालिकांमध्ये मिळून काँग्रेसला केवळ ५५ जागा जिंकता आल्या. सूरतमध्ये तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. तर आपनं २७ जागा जिंकल्या. त्यामुळे आप सूरत महापालिकेत विरोधी पक्ष असेल. आता, एमआयएमलाही गुजरातमध्ये नगरपालिकेत विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली आहे.
Grateful to people of Modasa for blessing @aimim_national with their love & trusting us with their votes. We're now chief opposition party in Modasa & inshallah we'll fulfil the role to best of our abilities. Congrats to our Gujarat election team & newly elected representatives https://t.co/3nVYTKRXlz
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) March 2, 2021
गुजरातच्या मडोसा नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने 12 पैकी 9 जागा जिंकत मोठं यश मिळवलं. त्यामुळे, येथील नगरपालिकेत आता प्रमुख विरोधी पक्षपदाची जबाबदारी एमआयएमकडेच असणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. तसेच, एमआयएमच्या वर्धापन दिनी असुदुद्दीन औवेसी यांनी गुजरातमधील मोडासाच्या जनेतनं चांगली भेट दिलीय, असेही जलील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच, विजयी उमेदवारांचं अभिनंदनही त्यांनी केलीय.