काश्मीरवर हवा राजकीय तोडगा
By admin | Published: August 21, 2016 03:46 AM2016-08-21T03:46:10+5:302016-08-21T03:46:10+5:30
गेले ४३ दिवस काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीयदृष्ट्याच तो प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी काश्मीरमधील सर्व संबंधितांशी केंद्र सरकारने ताबडतोब
नवी दिल्ली : गेले ४३ दिवस काश्मीर खोऱ्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राजकीयदृष्ट्याच तो प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी काश्मीरमधील सर्व संबंधितांशी केंद्र सरकारने ताबडतोब चर्चा सुरू करावी, अशी विनंती काश्मीरमधील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शनिवारी केली.
काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याची तक्रारही या नेत्यांनी केली. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. ए. मीर, माकपचे आमदार तारिगामी, अपक्ष आमदार हकीम यासीन व काँग्रेसचे अनेक आमदार होते. काश्मीरमधील जनतेशी केंद्र आणि राज्य सरकारचा संवाद पूर्णपणे तुटला असून, तो नव्याने सुरू करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रपतींना सांगितल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांना दिली. काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित गटांशी चर्चा करणे आवश्यक आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांद्वारे बळाचा वापर केला जात असून, त्यामुळे जनतेमध्ये संताप आहे. त्यातच पेट्रोलपासून अनेक जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्यामुळे जनतेचे हाल सुरू आहेत, असे ते म्हणाले (वृत्तसंस्था)
अन्य भागांतही पसरतेय आंदोलन
आतापर्यंत काश्मीरच्या खोऱ्यातच असलेले आंदोलन आता जम्मू आणि कारगिलच्या पीर पंजाल आणि चेनाबच्या खोऱ्यातही पसरत चालले आहे. या प्रकारे संपूर्ण जम्मू-काश्मिरात आंदोलन पसरले, तर स्थिती भयानकच होईल, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी लवकरात लवकर स्थिती सुधारण्यासाठी केंद्राला पावले उचलायला सांगावे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
काश्मीरमधील सर्व जनता अतिरेक्यांबरोबर आहे, असे समजणेच मुळात चुकीचे आहे, पण सरकारी यंत्रणा जनतेला फुटीरवादी समजून, त्यांच्याशी तसे वागत आहे आणि त्यामुळे वातावरण आणखी चिघळले आहे, असा आरोप शिष्टमंडळातील नेत्यांनी केला.
काश्मिरात ४३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीत
काश्मीर खोऱ्यातील जनजीवन सलग ४३ व्या दिवशीही सुरळीत होऊ शकले नाही. श्रीनगर जिल्ह्यासह अनंतनाग आणि पम्पोर शहरांतील संचारबंदी शनिवारीही सुरू होती. खोऱ्यात आतापर्यंत ६४ लोकांचा बळी गेला आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कार्यालये आज बंद होती, तर सरकारी कार्यालयांतही फारशी
उपस्थिती नव्हती.
सहा दिवसांच्या निर्बंधानंतर खोऱ्यात पोस्टपेड मोबाइल सेवा शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. अफवा पसरू नयेत, यासाठी खोऱ्यातील मोबाइल सेवा बंद करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सर्व कंपन्यांची पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्री-पेड मोबाइलची आउटगोइंग सेवा सुरू झालेली नाही.
शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा घणाघाती हल्ला गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे केला. हा शेजारी देश खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. तिरंगा रॅलीला संबोधित करताना ते येथे बोलत होते.