कर्नाटकच्या राज्यपालांशिवाय एअर एशिया विमानाचे उड्डाण, चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 05:04 PM2023-07-28T17:04:40+5:302023-07-28T17:05:30+5:30
90 मिनिटे वाट पाहिल्यानंतर राज्यपाल दुसऱ्या विमानाने हैदराबादला रवाना झाले.
कर्नाटकातील बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना न घेता एअर एशियाचे विमान हैदराबादसाठी रवाना झाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 वरून हैदराबादला जाणार होते. या प्रकरणाबाबत राज्यपालांच्या प्रोटोकॉल टीमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यपाल वेळेपूर्वी व्हीव्हीआयपी लाउंजमध्ये थांबले होते. व्हीआयपी लाउंजमधून ते धावपट्टीवर पोहोचले, तोपर्यंत विमान हैदराबादला रवाना झाले. त्यानंतर 90 मिनिटे वाट पाहिल्यानंतर राज्यपाल दुसऱ्या विमानाने हैदराबादला रवाना झाले.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
प्रोटोकॉल टीमच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यपाल थावरचंद गेहलोत गुरुवारी (27 जुलै) दुपारी 1.30 वाजता विमानतळावर पोहोचले होते आणि टर्मिनल 1 च्या व्हीव्हीआयपी लाउंजमध्ये बसले होते. तसेच, एअरलाइन्सच्या ग्राउंड स्टाफला राज्यपाल आल्याची माहिती देण्यात आली होती. एअर एशियाचे हे विमान दुपारी 2.50 वाजता उड्डाण घेणार होते. राज्यपाल टर्मिनल 1 वरून 2:06 वाजता टर्मिनल 2 वर पोहोचले, परंतु एअरलाइन्सच्या स्टाफने विलंबाचे कारण देत त्यांना विमानात बसण्याची परवानगी दिली नाही.
90 मिनिटांनंतर दुसऱ्या विमानाने रवाना
पीटीआय एजन्सीनुसार, राज्यपाल थावरचंद गेहलोत गुरुवारी दुपारी टर्मिनल-2 वरून हैदराबादला जाणार होते, तेथून ते दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी रस्त्याने रायचूरला जाणार होते. एअर एशियाचे विमान येताच गेहलोत यांचे सामान त्यात चढवण्यात आले होते. दरम्यान, सुत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. ते व्हीआयपी लाउंजमध्ये पोहोचले, तोपर्यंत विमान हैदराबादला रवाना झाले होते. त्यानंतर हैदराबादला पोहोचण्यासाठी राज्यपालांना 90 मिनिटांनी दुसरे विमान घ्यावे लागले.