आरोपांची ‘हवाबाजी’ !
By Admin | Published: September 11, 2015 05:37 AM2015-09-11T05:37:10+5:302015-09-11T05:37:10+5:30
काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले
भोपाळ : काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘हवाबाजी’च्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
जीएसटी पारित होऊ न दिल्याचा उल्लेख करीत मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला चढविला. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि लोकशाहीच्या मार्गात हवालाबाजांनी अडचणी आणल्या आहेत. काळ््या पैशासंबंधी कठोर कायद्यामुळे ते त्रस्त झाले आहेत.
सोनिया गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीला संबोधित करताना मोदींनी निवडणूक प्रचाराच्यावेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ ठरली, असे टीकास्त्र सोडले होते. त्यावर मोदी भोपाळ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, हवालाबाज (घोटाळेबाज) आमच्याकडे उत्तर मागत आहे. आमच्या सरकारने अनेक योजनांमधील पळवाटा रोखत देशाचा खजिना समृद्ध केला आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला अद्यापही सावरता आलेले नाही. त्यामुळेच या पक्षाने खोळंबा करण्याचे तंत्र अवलंबले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे वाया गेले. जीएसटी विधेयक लांबणीवर पडण्यासाठी हा पक्षच जबाबदार आहे. अन्य पक्षांना सभागृह चालावे, कामकाज व्हावे असे
वाटत होते. केवळ काँग्रेसला ते मान्य
नव्हते. मग्रुरीतून आलेल्या संघर्षाच्या वृत्तीला लोकशाहीत स्थान आहे काय? जनतेने ज्यांना नाकारले, पराभूत केले अशा पक्षांना मी संसदेचे कामकाज चालू द्यावे असे आवाहन जाहीररीत्या केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
या प्रकरणी मोदी गप्प का?
विदेशमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत मोदी एक शब्दही बोलले नाहीत. ते आता गप्प का? असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.
आमच्या सरकारने हवालाबाजांच्या नाड्या आवळल्या आहेत, असे मोदींनी म्हटले होते. सोनिया गांधी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर असून त्यांनी येथे स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. मोदींच्या विधानाबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती.
हवाबाज, दगाबाज हे जनतेने दिलेले संबोधन
निवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोक सत्तेवर आल्यानंतर सर्व काही विसरल्यामुळे देशातील जनता त्यांना हवाबाज आणि दगाबाज असे संबोधत आहे, असे काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख रणदीपसिंग सूरजेवाला यांनी दिल्लीत म्हटले आहे.