दिवाळीच्या दिवशी दिल्लीतील हवा सर्वाधिक प्रदूषित
By admin | Published: December 4, 2015 01:37 AM2015-12-04T01:37:39+5:302015-12-04T01:37:39+5:30
दिल्लीत दिवाळीच्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी हवेत प्रदूषण निर्माण करणाऱ्या सूक्ष्म कणांचा (पीएम १० आणि पीएम २.५)चा स्तर सामान्यांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.
नवी दिल्ली : दिल्लीत दिवाळीच्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी हवेत प्रदूषण निर्माण करणाऱ्या सूक्ष्म कणांचा (पीएम १० आणि पीएम २.५)चा स्तर सामान्यांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. २४ तासांची निगराणी पाहता प्रदूषणाचा स्तर निर्धारित मर्यादेतच होता, असे वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत एका उत्तरात सांगितले.
दिल्लीत दिवाळीच्या दिवशी प्रदूषणाचा स्तर अन्य दिवसांच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता काय? असेल तर त्याचे कोणते दुष्परिणाम नोंदण्यात आले.
राष्ट्रीय हरित लवादाने वायुप्रदूषण रोखण्यासाठी काही अटी लागू केल्या होत्या किंवा नाही, असा प्रश्न खा. विजय दर्डा यांनी विचारला होता.
दिवाळीच्या दिवशी सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड आणि कार्बन मोनोक्साईड यांचे २४ तासांतील सरासरी प्रमाण धोकादायक मर्यादेच्या आतच होते. बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, कोलकाता आणि वडोदरासारख्या शहरांमध्येही अशाच प्रकारचे प्रमाण आढळून आले.
वायुप्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवादाने निर्देश दिले होते. फटाके फोडण्यामुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासारख्या उपाययोजनांचा या निर्देशांमध्ये समावेश होता, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)