२२ हायवे बनणार हवाई दलाचे इमर्जन्सी रन वे
By Admin | Published: October 18, 2016 04:50 AM2016-10-18T04:50:02+5:302016-10-18T04:50:02+5:30
उत्तरप्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ४ राज्यांतील २२ महामार्ग (हाय वे) विमानळाच्या रन वे सारखे विकसित करण्याच्या योजनेवर कार्यवाही
सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- युध्दकाळात लढाऊ विमानांच्या लँडिंग व टेक आॅफ साठी हायवेंचा वापर करता यावा, या हेतूने उत्तरप्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ४ राज्यांतील २२ महामार्ग (हाय वे) विमानळाच्या रन वे सारखे विकसित करण्याच्या योजनेवर कार्यवाही सुरू झाली आहे. केंद्रीय संरक्षण व भूतल परिवहन मंत्रालय या प्रकल्पावर संयुक्तपणे काम करीत आहेत. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतातल्या दुर्गम व अवघड भागातही हवाई वाहतुकीचे नेटवर्क सुरू होऊ शकेल, अशी माहिती भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
त्यासाठी संरक्षण व भूतल परिवहन मंत्रालयाची त्यासाठी संयुक्त समिती नियुक्त करण्यात आली आहे. ज्या राज्यात हे प्रस्तावित २२ हाय वे आहेत, त्यांचा गरजेच्या वेळी हवाई दलाला रन वे सारखा वापर करता आला पाहिजे, यासाठी स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रक्रिया तयार करावी लागणार आहे. भूतल परिवहन मंत्रालयाने संबंधित राज्यांना त्यासाठी मार्गदर्शन करावे, असे हवाई दलाने सुचवले आहे.
बांगला देश मुक्ती संग्रामाच्या काळात पाकची काही विमाने आग्य्रापर्यंत आली होती. या लढाऊ विमानांना भारतात बॉम्बचा वर्षाव करता आला नाही कारण भारतीय हवाई दलाने त्याआधीच त्यांना परतवून लावले. तेव्हापासून आपल्या लढाऊ विमानांच्या इमर्जन्सी टेक आॅफ व लँडिंग साठी देशांतर्गत व्यवस्था असली पाहिजे, हा विचार सुरू झाला. भारतात २१ मे २0१५ रोजी दिल्ली-आग्रा यमुना एक्सप्रेस वे वर मिराज २000 च्या लँडिंगचा सफल प्रयोग हवाईदलाने केला.
>पाकमध्येही असे रन वे
पाकिस्तानात इस्लामाबाद ते पेशावर व लाहोर ते इस्लामाबाद हे दोन महामार्ग असे आहेत की, ज्याच्या ४ धावपट्ट्यांचा रन वे सारखा वापर होऊ शकतो. पाकिस्तानने २000 साली या महामार्गांवर लढाऊ विमानांच्या लँडिंगची चाचणीही घेतली होती.
उरी येथील तळावर हल्ला झाल्यानंतर, उभयपक्षी तणावात प्रचंड वाढ झाली होती.
पाकिस्तानने यावेळी इस्लामाबादजवळील हायवे चा रनवे सारखा वापर केल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी व्टीटरवर काही छायाचित्रे पोस्ट करून दिली होती.